पोलिसांनी लाठीचार्ज करत दडपशाही केल्याचा बच्चू कडू यांचा आरोप


एएमसी मिरर : वेब न्यूज 
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार संघटना अध्यक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करा यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित केला होता. मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवल्याने बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला असून आंदोलनाला परवानगी देत नाही, पण हुक्का बार चालू ठेवता, अशा शब्दांत सुनावले आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करत दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी बच्चू कडू यांनी केला.

सत्ता स्थापनेचा पेच न सुटल्याने तसंत कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. यासंबंधी बोलताना बच्चू कडू यांनी आपण पाच लोक घेऊन मंत्रालयात चाललो होतो, पण पोलिसांनी त्यासाठीही नकार दिला. सरकार नाही म्हणजे सगळं संपलं असं नाही असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी पाच दिवसांत निर्णय दिला नाही तर न सांगता राजभवनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला.
पोलिसांनी कारवाई करत बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांची सुटका कऱण्यात आली. यानंतर बच्चू कडू आझाद मैदानात पोहोचले. यावेळी त्यांनी राज्यपालांनी किमान मदतीची घोषणा तरी करावी अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांना मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. यानंतरही बच्चू कडू यांनी आपण मोर्चा काढणारच असल्याचं सांगितलं होतं. यामुळे पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच आंदोलकांनी पोलिसांची गाडीच अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. बच्चू कडू यांना नोटीसही पाठवण्यात आली होती. यानंतर नाराजी व्यक्त करत बच्चू कडू यांनी आपण पुढच्या वेळी आंदोलन करताना काहीही न सांगता थेट पोहोचू असा इशाराच दिला.

Post a Comment

Previous Post Next Post