लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची हत्या


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजता घडली. सुमन चव्हाण (वय २२) असे मयत प्रेयसीचे नाव आहे. तर बरकत अली (वय २०) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, असं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
शनिवारी सकाळी प्रेयसी सुमन आणि प्रियकर बरकत हे काम करत असलेल्या कंपनीत आले. सर्व कामगार नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले. तेव्हा बरकत आणि सुमन हे दोघेच कंपनीत होते. सुमन नुकतीच मूळ गाव उत्तर प्रदेश येथून आली होती. तिच्या लग्नाचा विषय गावी सुरू होता. याची कुणकुण बरकतला लागली. त्यामुळे एकांतात असलेल्या प्रेयसीला बरकतने आपण लग्न करूयात असे म्हटलं. त्यावर सुमन हिने लग्नास नकार दिला. नकाराने चिडलेल्या बरकतने सुमनच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
खून केल्यानंतर रागात असलेल्या बरकत घाबरला व पळून गेला. परंतु, भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पुणे रेल्वे स्थानकात येथे पोहोचले. सर्व ठिकाणी आरोपी बरकतचा पोलिसांनी शोध सुरू केला. तेव्हा, पोलीस निरीक्षक गाढवे, पोलीस कर्मचारी विधाते, भोसले यांनी आरोपी गोरखपूर रेल्वेत बसणार तेवढ्यात त्याला फिल्मीस्टाईल ताब्यात घेतले.
मयत सुमन ही गेल्या तीन महिन्यांपासून जुन्या कपड्यापासून हाताचे ग्लोज करणाऱ्या कंपनीत काम करत होती. तर आरोपी बरकत ही त्याच कंपनीत कामाला होता. त्यांचं प्रेम प्रकरण तेथून सुरू झालं. सुमन ही दोन भावांसह भोसरी येथील सद्गुरू नगर येथे भाड्याच्या खोलीत राहात होती.

Post a Comment

Previous Post Next Post