उध्दव ठाकरे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेच्या हालचाली करत असताना शिवसेना नेत्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपसोबत काडीमोड घेऊन शिवसेनेने काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत महाशिवआघाडी करून सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदाराने याचाच आक्षेप घेतला आहे. या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही नाव आहे.
शिवसेनेने महायुतीच्या नावाखाली मत घेतली आणि आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. यामुळे आमची फसवणूक झाल्याची तक्रार रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसांत दाखल केली आहे. औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. महायुतीच्या नावाखाली मते घेतली, पण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करत आमची फसवणूक करत असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे, प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांनी 10 ते 12 ऑक्टोबरदरम्यान औरंगाबादमध्ये प्रचार केला. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सेना-भाजप महायुतीला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे मी आणि माझ्या कुटुंबाने त्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना मतदान करुन निवडून दिले.
निवडणूक निकालामध्ये भाजप समर्थकांची मते पाहता प्रदीप जैस्वाल निवडून आले. निकालानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडली आणि महायुतीसोबत सरकारही स्थापन केले नाही. त्यामुळे मी भाजप समर्थक आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेले मतदान वाया गेले. हिंदुत्वाच्या नावे मते मागून माझी फसवणूक केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा’’ असे रत्नाकर चौरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post