'केंद्राकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक पैसाही मिळाला नाही'


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर आणि परतीच्या पवासामुळे झालेल्या नुकसानानंतरही केंद्राने राज्यातील शेतकऱ्यांना काहीच मदत दिलेली नाही असं सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. राज्यसभेमध्ये संभाजीराजेंनी राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे असं सांगतानाच केंद्राकडून ती पुरवली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संभाजीराजेंनी राज्यसभेतील आपल्या भाषणाचा व्हिडिओही ट्विट केला आहे.
“महाराष्ट्रामध्ये महापूराने आणि परतीच्या पावसाने खरीपाच्या पिकाचे मोठे नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं वाया गेली आहेत. एका आकडेवारीनुसार ५४ लाख हेक्टर सुपीक शेतजमीनीवरील मालाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. यानंतर राज्य सरकारने केंद्राला दोन अहवाल पाठवले आहे. जुलै आणि ऑगस्टमधील महापूरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सहा हजार ८१३ कोटी रुपयांच्या मदतीनिधीची मागणी केली होती. तसेच परतीच्या पवासामुळे ऑक्टोबर महिन्यात झालेले शेतमालाची नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार ७०२ कोटींची केंद्राकडून मागणी केली होती. मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की यातील एक रुपयाही महाराष्ट्राला केंद्राने दिलेला नाही,” अशी खंत संभाजीराजेंनी राज्यसभेमध्ये बोलून दाखवली.
“२०१६ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र सरकारने सुरु केली. मात्र याचा विमा कंपन्यांची फायदा घेऊन मोठी लूट केली. शेतकऱ्यांनी केलेले नुकसान भरपाईचे दावे या कंपन्यांनी लांबवले. यामागे त्यांच्या हेतू स्पष्ट झालेला नाही. कॅगनेही आपल्या अहवालामध्ये विमा कंपन्यांना एक हजार कोटींपेक्षा जास्तचा फायदा झाल्याचे नमूद केले आहे. असं असलं तरी तीन महिन्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीचा एक पैसाही मिळालेला नाही,” असंही संभाजीराजे म्हणाले.
“विमा कंपन्यांची लूट व शेतकऱ्यांची परवड याविषयी संसदेत आवाज उठवला. कोल्हापूर – सांगली महापुराच्या नुकसान भरपाईचा आणि परतीच्या पावसाने खरिपाच्या नुकसान भरपाईचा एक रुपयाही अजून राज्याकडे पोचला नाही याचा जाब विचारुन सरकारने तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सभागृहात सांगीतले,” असं संभाजीराजेंनी ट्विट करताना म्हटलं आहे.
“केवळ नफा कमवण्यासाठी काम करणाऱ्या, शेतकऱ्यांकडे अन्नासाठीही पैसे नसताना त्यांना मदत न करणाऱ्या या विमा कंपन्यांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी,” अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post