ऐतिहासिक अयोध्या खटल्याचा आज निकाल


एएमसी मिरर : वेब न्यूज 
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज (९ नोव्हेंबर) दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. ए. अब्दुल नाझीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सलग ४० दिवस या खटल्याची सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री तसेच भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वादग्रस्त विधान न करण्याची सूचना केली आहे. अयोध्येच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जो काही निकाल येईल, तो कुणाचा विजय किंवा पराभव नसेल.  दोन्ही समाजात सलोखा आणि सामंजस्य राहावे, यासाठी गेल्या आठवड्यात बैठकाही झाल्या होत्या. 

न्यायालयाचा निर्णय स्वीकारून शांतता राखा : गडकरी
अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून आज निकाल दिला जाणार असून, केंद्रीय परिवहन मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनीही  शांततेचं आवाहन केलं आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारून लोकांनी शांतता राखावी, असे त्यांनी म्हटले आहे.

सरन्यायाधीशांकडून सुरक्षेचा आढावा
अयोध्येचा खटला राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश गोगोई यांनी अयोध्या तसेच, संपूर्ण उत्तर प्रदेशमधील सुरक्षेचा आढावा घेतला आणि त्या नंतरच निकालाचा दिवस निश्चित केला. शनिवार-रविवारी न्यायालयाचे कामकाज बंद असते. पण, अयोध्या खटल्याचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल देण्याचे ठरवले. शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी न्या. गोगोई यांची भेट घेऊन त्यांना कायदा-सुव्यवस्थेची माहिती दिली होती.

सर्वोच्च न्यायालयात १४ आव्हान याचिका
अयोध्येतील २.७७ एकर वादग्रस्त जमीन तीन दावेदारांमध्ये विभागण्याचा निकाल २०१० मध्ये अलाहाबाद खंडपीठाने दिला होता. त्यानुसार, रामलल्ला विराजमान, निर्मोही आखाडा आणि उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात या जमिनीचे वाटप करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. एकूण १४ आव्हान याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एकत्रित सुनावणी घेतली.

अयोध्येत निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात
निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह उत्तर प्रदेशात कायदा सुवस्थेच्या दृष्टीनं खबरदारीचे उपाय योजन्यात आले आहेत. निमलष्करी दलाच्या ६० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव दलाचे १२०० पोलीस नेमण्यात आले आहेत. तर २५० पोलीस उपनिरीक्षक २० पोलीस उप अधीक्षक, दोन पोलीस अधीक्षक ३५ सीसीटीव्ही, १० ड्रोन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. नेहमीप्रमाणेच भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी येत आहे. कोणत्या प्रकारचे बंधन घालण्यात आलेले नसून, बाजारपेठही सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे सामान्या आहे, अशी माहितील उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशुतोष पांडेय यांनी दिली.

निकालानंतर मोहन भागवत साधणार संवाद
अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीतील केशव कुंज परिसरात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाच्या प्रतिनिधींशीही अशोक रोड येथे संवाद साधणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post