उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती : शरद पवार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे. शरद पवार यांनी बैठकीच्या बाहेर आल्यानंतर ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आम्ही पुढे केलं आहे. तिन्ही पक्षांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हा आमच्या समोरचा अजेंडा नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीच्या बैठकीत दुसरं नाव चर्चेत होतं ते संजय राऊत यांचं. उद्धव ठाकरेंनी जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास नकार दिला तर संजय राऊत यांच्या नावाला शरद पवारांनी पसंती दर्शवली होती असंही समजतं आहे. संजय राऊत यांनी ही महाविकास आघाडी घडवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे आणि काही दिवसातच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊ शकतं. दरम्यान शरद पवार या बैठकीतून त्यांच्या काही खासगी कामासाठी बाहेर पडले आहेत. त्यांनी बाहेर पडताच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील यावर आमच्या मनात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान ही बैठक अजूनही सुरु आहे. शरद पवार बैठकीतून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरेही बैठकीच्या बाहेर पडले. त्यांनी मात्र कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली की आम्ही तुम्हाला माहिती देऊ असं उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे. अडीच अडीच वर्षांचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न विचारला असता “नेतृत्त्वाबाबत कोणताही प्रश्न आमच्या कुणाच्याही मनात नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यावर सहमती झाली आहे” अशी माहिती शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीबाहेर पडल्यानंतर दिली.

Post a Comment

Previous Post Next Post