आता रडायचं नाही, लढायचं : उद्धव ठाकरेएएमसी मिरर : वेब न्यूज
गेल्या १० ते १५ दिवसात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील जानापुरी या ठिकाणी शेतावर जाऊन पाहणी केली. त्यावेळी इथल्या शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंपुढे आपल्या भावना मांडल्या आणि शेतकऱ्यांना जगवा असं आवाहन केलं. त्यावर आता रडायचं नाही तर लढायचं असं उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे.
नांदेडमध्ये आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी घास हिरावला गेला आहे. अशा स्थितीत बळीराजा हवालदिल झाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. तरीही राजकारणापेक्षा शेतकरी महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा सुरु केला. आता या शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे उभारा असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.
जानापुरी लोहा या ठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आले हे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तुम्हीच आता काहीतरी करा आणि शेतकऱ्यांना वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, त्यानंतर ते पुढील गावात दौऱ्यासाठी निघून गेले.

Post a Comment

Previous Post Next Post