अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याची खात्री : संजय राऊत


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना आज घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार हे परतण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याची मला खात्री आहे. ते परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी बहुमत सिद्ध करून दाखवावं. सकाळी अजित पवार यांच्यासोबत ८ आमदार होते. त्यापैकी पाच आमदार परत आले. धनंजय मुंडे यांच्याशीही संपर्क झाला आबे. सर्वच जण लवकरच परत येतील. वेळ आली की पुरावे देऊ, असं राऊत यावेळी म्हणाले.
शरद पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही सरकार स्थापन करू आणि सरकार आमचंच स्थापन होईल. अंधारात केवळ पाप होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं होतं. पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे, असं स्टेटस सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅपवर ठेवलं होतं. त्यामुळे पवार कुटुंबीयांमध्ये आता फुट पडल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, अजित पवार यांनी जे काही केलं त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचं सांगत तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं शरद पवार म्हणाले होते. दरम्यान, आपणही यापासून अनभिज्ञ असल्याचंही ते म्हणाले होतं.

Post a Comment

Previous Post Next Post