राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. कालच्या राज्यकर्त्यास जनतेने वेडे किंवा मूर्ख ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नाही. एकतर नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांच्या नावाने त्यांचे खेळ सुरू आहेत व यात मोदी यांचेच नाव बिघडत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आहे व राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर 105 वाल्यांचा आत्मविश्वास असा काही फसफसू लागला आहे की, जणू मुंबईच्या अरबी समुद्रात लाटाच उसळत आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत विनम्रपणे त्यांच्या आमदारांना सांगितले की, बिनधास्त रहा, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येत आहे. राज्यात ज्याच्यापाशी 145 चा आकडा आहे त्याचे सरकार येईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कालच सांगितले आहे व ते घटनात्मकदृष्ट्या बरोबर आहे. बरे, आता जे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे सांगत आहेत त्या 105 वाल्यांनी
आधीच राज्यपालांना भेटून
स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे बहुमत नाही! त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवंटय़ाखालून कसे बाहेर पडणार, हा प्रश्न असला तरी आम्ही लोकशाही व नैतिकतेचा खून करून ‘आकडा’ लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. मग बोलणाऱया तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे वचन देणाऱयांचा हा खोटारडेपणा आहे व तो पुनःपुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन येथे कुणी जन्मास आलेले नाही. स्वतःस जगज्जेते वगैरे म्हणवून घेणारे नेपोलियन, अलेक्झांडरसारखे योद्धेही आले आणि गेले. श्रीरामालाही राज्य सोडावे लागले. औरंगजेब शेवटी याच भूमीत गाडला गेला. तेव्हा अजेय असल्याच्या गमजा उगाच का मारायच्या? एका बाजूला फडणवीस ‘‘राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार!’’ असा दावा करतात तर दुसऱया बाजूला नितीन गडकरी यांनी क्रिकेटचे रबरी चेंडू राजकारणात टोलवले आहेत. ‘क्रिकेट व राजकारणात अंतिम काहीच नाही. कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरू शकतो. एका क्षणी हातातून गेलेल्या सामन्यात आपण विजय मिळवू शकतो,’ असा सिद्धांत गडकरी मांडतात. गडकरी यांचा क्रिकेटशी संबंध नाही. त्यांचा संबंध सिमेंट, इथेनॉल, डांबर वगैरे वस्तूंशी आहे. संबंध असलाच तर तो शरद पवार आणि क्रिकेटचा आहे. आता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा हे
भारतीय क्रिकेट बोर्डाचे
सचिव झाले. त्यामुळे भाजपचा क्रिकेटशी अधिकृत संबंध जोडला गेला आहे. गडकरी म्हणतात त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काय घडेल त्याचा भरवसा नाही. हल्ली क्रिकेट हा खेळ कमी आणि धंदाच जास्त झाला आहे व क्रिकेटच्या खेळातही राजकारणाप्रमाणे ‘घोडेबाजार’ सुरू झाला आहे. राजकारणात सट्टेबाजाराचा जोर आहे तसा तो क्रिकेटमध्येही सुरू झाल्याने ‘फोडाफोडी’ आणि ‘फिक्सिंग’चा तो खेळ मैदानावर सुरूच झालाय. त्यामुळे तिथेही खेळ जिंकतो की फिक्सिंग जिंकते हा संशय राहतोच. म्हणूनच गडकरी यांनी महाराष्ट्राच्या राजकीय खेळास क्रिकेटच्या रोमांचक खेळाची दिलेली उपाधी योग्यच आहे. राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते ‘पंच’ फुटल्यावर (किंवा फोडल्यावर) पराभवाच्या टोकास गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. ‘‘आता आमचेच सरकार!’’ हा आत्मविश्वास त्यातून जागा झाला असेलही, पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. ती हातात घेऊन जनता तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही. ‘‘पुन्हा आमचेच सरकार!’’ अशा किंकाळय़ा महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्याचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतके मनास लावून घेऊ नका. ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे जसे सत्य तसे कुणीच अजिंक्य नाही हेसुद्धा सत्यच आहे. महाराष्ट्रात सत्य भगव्याच्या तेजाने फडकणार आहे.