राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार; उध्दव ठाकरेंचे संकेत


एएमसी मिरर : वेब न्यूज
गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. अमित शाह यांच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन पहिल्यांदाच माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला, याचं दुःख वाटलं. शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. अमित शाह यांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलले आहेत. सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे मी पाहिलं. देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी चर्चा थांबवली हे खरं आहे. ५०-५० चा फॉर्म्युला ठरलाच नव्हता, हे देवेंद्र फडणवीस म्हणाले हे साफ खोटं आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला आहे. दरम्यान, शिवसेना प्रमुखांना शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल, असे वचन दिलेले आहे. त्यावर मी आजही ठाम आहे, ते मी पाळणारच, असे सांगत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असे संकेतही ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबईतल्या रंगशारदा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले उध्दव ठाकरे?
लोकसभेवेळी अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचे वचन दिले होते. ते मला पूर्ण करायचे आहे, असे स्पष्ट सांगितले. त्यांनी हा फॉर्म्युला मान्य केला होता. यानंतर कोणी जर माला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्याशी मला कोणतेही नाते ठेवणा येणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना मोदींवर जहरी टीका करते, हे सहन होणारे नाही. त्यामुळे त्यांच्याशी संबंध का ठेवायचे? असा सवाल केला होता. उद्धव ठाकरेंनी याला प्रत्युत्तर देताना तुम्हाला मोदींवर टीका करणारे उदयन राजे आणि हरियाणाचे नेते चालतात का? असा प्रतिप्रश्न केला. काळजीवाहू मुख्यमंत्री बहुमत नसताना नवीन सरकार भाजपचेच येईल, असा दावा कसे काय करतात?  अशीही विचारणा त्यांनी केली.  
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. आता काळजी संपली. त्यांनी पाच वर्षांत अचाट काम केली आहेत. गेल्या पाच वर्षांत आम्ही कुठेही विकासकामात राजकारण आणले नाही. आम्ही शब्द देताना विचार करून दिलेला आहे. दहा वेळा विचार करून शब्द दिला. पाच वर्षांत जनतेच्या हिताचे मुद्दे मांडले. कोणाचाही पर्वा न करता जनतेचे मुद्दे मांडत आलो. म्हणूनच महाराष्ट्रातील जनतेचा शिवसेनेवर विश्वास दिसून आला. ठाकरे परिवारावर पहिल्यांदाच असा खोटारडेपणाचा आरोप झालाय, असे उध्दव ठाकरे म्‍हणाले.
शिवसेनाप्रमुख, त्यांचा परिवार काय आहे, याबद्दल महाराष्ट्र जाणून आहे. अमित शहा आणि कंपनीने आमच्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी मी तिकडे गेलो नव्हतो. अमित शहा आणि फडणवीसच आमच्याकडे आले होते. आमच्याकडे युतीच्या चर्चेचा प्रस्ताव आला, तेव्हा उपमुख्यमंत्री पद मिळेल, असे सांगितले होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले होते की, मी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणारच. शिवसेनाप्रमुखांना हे वचन मी दिले होते.
अमित शहा यांचा फोन जेंव्हा आला. तेंव्हा ते म्हणाले होते की ठिक आहे. त्यांनी अडीचवर्षे मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानंतर ते मातोश्रीवर आले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीमध्ये आलो आहे. जे नाते विस्कटले आहे, ते पूर्ववत करण्यासाठी पदाचे वाटप करू. पद आणि जबाबदारीचे समसमान वाटपाचे त्यांनी आश्वासन दिले होते. मला यांच्या खरे खोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. २०१४ साली एकाकी लढलो. परंतू यावेळी त्यांनी गोड बोलून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केल्‍याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी यावेळी केला.
फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी वाद नाही. ठरले होते आणि देऊ शकलो नाही तर ठिक आहे. जे ठरले होते, ते खोटे आहे, अशी माझी ओळख होऊ देणार नाही. मला जे जमेल ते बोलले. अनौपचारिक वक्तव्यानंतर केलेले वक्तव्य धक्कादायक वाटले. त्यामुळे आम्ही चर्चा थांबवली.
२०१४ साली शिवसेना भाजपसोबत होती. त्यावेळी आमच्या गळ्यात अवजड उद्योग खाते दिले. तेच खाते आमच्या गळ्यात बांधले. मी वेगळा झालो नाही. खोटं बोलण्याचा हिशोब काढला. मी अजूनही भाजपला शत्रुपक्ष मानत नाही. अच्छे दिनाचे स्वप्न कोणी दाखवले. नोटबंदी कोणी केली. आम्ही खोटं बोलत नाही.
१४४ जागा मागितल्या. चंद्रकांत पाटील यांनी १६३ घेतल्या. साताऱ्यातील उदयनराजे यांना कोणी फोडले. आम्ही मोदींवर टीका केली नाही. मोदी मला लहान भाऊ म्हणाले असतील तर कोणाच्या पोटात दुखत असेल तर दुर्देवी आहे. शब्द देऊन फिरवणारी आमची वृत्ती नाही. सरळ सांगावे की आमचे जे ठरले होते, ते आम्ही मानत नाहीत, असे सरळ सांगावे. हिंदूत्व मानणाऱ्या शक्ती पुन्हा मनापासून एकत्र आल्याचे बरं वाटलं होते. पण गंगा साफ करता करता, यांची मने कलुशित झाली. यांच्या मनामध्ये सत्तेची लालस, लालच दिसते, तीही दुर्देवी आहे. चुकीच्या माणसासोबत गेल्याचे दुखः वाटते. संघाविषयी मला आदर आहे. संघाने विचार करायला पाहिजे, खोटं बोलणे कोणत्या हिंदूत्वात बसते, असा प्रश्नही त्‍यांनी यावेळी भाजपला विचारला.
राम मंदिर सरकारचा निर्णय नाही. कोर्टातून निर्णय येणार आहे. रामाचा गुण आपण पाळणार नसू तर काय उपयोग. सर्व पर्याय खुले आहेत. याचा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. बहुमत नसताना आमचे सरकार कसे येणार, या वक्तव्याबद्दल तुम्ही खुलासा करावा. गोवा, कर्नाटक, मणिपूरमध्ये तुम्ही सरकार आणले, ते कसे आणले? असा प्रश्नही त्‍यांनी उपस्‍थित केला.
त्यांच्याशी बोलायला मला वेळ नाही. खोटं बोलणाऱ्याशी मी बोलणार नाही. खोटं नातं मला ठेवायचे नाही. आम्ही चोरून मारून काही करत नाही. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवता.

सर्वांना सर्व पर्याय खुले आहेत. त्यांनी बहुमत सिद्ध करावे. संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शेतात तळी झाली आहे. हे सुरू असताना अजूनही कर्जमाफी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. दुष्काळाचे अनुदान पोहचले नाही. शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेउन मदतकेंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत, असेही ते म्‍हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post