'मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा'



एएमसी मिरर : वेब न्यूज
मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली आहे.
 राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असताना उद्धव ठाकरे यांनी आज 'मातोश्री'वर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांशी बोलताना शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको. मला खोटं ठरवायचं असेल तर हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. भाजपला ठरवून बाजूला करायचं असं काही नाही, पण भाजप जर शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करेन. अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची? असेही त्यांनी म्हटले आहे.

आमदार हॉटेलमध्ये, शिवसेनेची खबरदारी
बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांशी इतर कोणाचाही संपर्क होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची रवानगी हॉटेल रंगशारदा इथे केली आहे. आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने हे पाऊल उचलल्याचं कळतं. सत्ताधाऱ्यांनी गेल्या काही दिवसात सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचे देखील राऊत यांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.
 


 

Post a Comment

Previous Post Next Post