बहुमत होतं तर काळोखात शपथ का घेतली?


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : अजित पवारांना फोडणे आणि सरकार स्थापन करणे हा भाजपाचा डाव होता. तो त्यांच्यावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता असं त्यांना वाटलं होतं. त्यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं. पण, भाजपाकडं बहुमत होतं, तर त्यांनी काळोखात शपथ का घेतली? असा सवाल संजय राऊत उपस्थित केला.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत यांनी भाजपाला आणीबाणीविषयी बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही, असं सांगत आरोपांचे बाण सोडले. राऊत म्हणाले, राज्याचा मुख्यमंत्री शपथ घेतो आणि हे राज्यातील जनतेलाच माहिती होत नाही. हे म्हणजे पाकिट मारणाऱ्या लोकांसारखच आहे. अजित पवारांना फोडणं आणि सरकार स्थापन करणं हा शेवटचा डाव होता. तो भाजपावर उलटला आहे. अजित पवारांबरोबर राष्ट्रवादीचे २५ आमदार येतील आणि बहुमत सिद्ध करता येईल असं त्यांना वाटलं, त्यामुळेच भाजपानं त्यांना उपमुख्यमंत्री पद दिलं. काल सरकार स्थापन केल्यानंतर भाजपानं मोजक्या लोकांना पेढे आणि लाडू भरवले, पण ते त्यांच्या घशाखाली उतरलेले नाहीत, असा चिमटाही राऊत यांनी भाजपाला काढला.
राज्यातील राष्ट्रपती राजवट पहाटे हटवण्यात आली. त्यानंतर भाजपाला सत्तास्थापनेचं राज्यपालांनी निमंत्रण दिलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला २४ तासांचा वेळ दिला होता. मात्र, भाजपाला ३० नोव्हेंपर्यंतची मुदत देण्यात आली. भाजपानं राष्ट्रपती भवन आणि राज्यपाल भवनाचा काळा बाजार केला आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
महाविकास आघाडीकडं १६५ आमदार आहे. आधी १७० इतकं संख्याबळ होतं पण, राष्ट्रवादीचे पाच आमदार अजित पवारांबरोबर गेले आहेत. राज्यपालांनी आजही शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज जरी बोलावलं तरी आम्ही सिद्ध करू. भाजपाला व्यापार कळतो, असं मला वाटत होतं. पण प्रामाणिकपणे व्यापार केला असता, तर अशी ठोकरा खाण्याची वेळ भाजपावर आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post