शिवसेना आमदारही आमच्यासोबत येऊ शकतात : गिरीश महाजन


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : आम्ही १७० आमदारांच्या पाठिंब्यासह बहुमत सिद्ध करु. अजित पवारांनी आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ होतो असे भाजपाचे नेते गरीश महाजन म्हणाले.
शिवसेनेकडून सातत्याने पक्षाची भूमिका मांडणारे संजय राऊत यांच्यावरही त्यांनी जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. अनेक शिवसेना आमदार संजय राऊत यांना कंटाळले आहेत. ते सुद्धा आमच्यासोबत येऊ शकतात असे गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने नाटयमय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली आहे. जनतेनं दिलेल्या जनादेशाचा शिवसेनेने अनादर केला, असं मत भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. आमच्याकडे सर्व पर्याय खुले आहेत असं म्हणत त्यांनी दगाफटका केला असंही ते म्हणाले.
जनतेने सर्वाधिक मताधिक्य भाजपाच्या पारड्यात टाकले होते. भाजपाला इतरांच्या दुप्पट १०५ जागा मिळाल्या होत्या. सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या विषयही त्यांनी सोडून दिला. संजय राऊत यांच्या तोंडी पाठित खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. त्यांनी शिवसेनेची वाट लावली आहे. त्यांनी आता तरी गप्प बसावं, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post