एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपावर हल्ला चढविला आहे. बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीस सरकार पळून गेलं. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याही सरकारची आणि राजकीय पक्षाची झाली नव्हती. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस संपला असून आता सर्व शुभ घडेल, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात, वाचा संपूर्ण लेख :

महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? आम्ही 162 चा आकडा दाखवूनही तो खोटा ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी केला. आता बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल!

सगळय़ांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटकेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले आहे. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला त्या अजित पवार यांनी सगळय़ात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गाने महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले सरकार फक्त 72 तासांत गेले. जनतेचा रेटा होताच, पण मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने राजभवनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. चोवीस तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले व फडणवीसांचे बेकायदेशीर पद्धतीने स्थापन झालेले सरकार गडगडेल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नव्हती. बहुमताचा साधा आकडा नसतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा पहिला गुन्हा व ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचे रक्षण व्हावे त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुह्यांस कवच दिले. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचे ढोंग केले त्यांनाही सर्वोच्च न्यायालयाने चपराक मारली आहे. सोमवारी संध्याकाळी महाआघाडीच्या 162 आमदारांनी देशाच्या जनतेसमोर येऊन एकजुटीचे प्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या बहुमताच्या दाव्याची हवाच त्यामुळे निघाली. सभागृहाबाहेर हा
बहुमताने केलेला पराभव
होता. आम्ही आमदार फोडू व बहुमत दाखवू या विकृतीसही सर्वोच्च न्यायालयाने वेसण घातली. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने नको, तर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ‘ई.डी., इन्कम टॅक्स’ वगैरे भाजपचे कार्यकर्ते काय करणार? संविधान दिवसाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल यावा आणि थैलीशाहीचे आणि दमनशाहीचे राजकारण करू पाहणाऱयांना दणका बसावा हादेखील एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल. सत्ताधाऱयांनी जरी लोकशाही मूल्यांचा आणि तत्त्वांचा बाजार मांडला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो उधळला गेला. पैशांच्या बॅगा घेऊन एजंट आमदारांच्या पाठी फिरत होते. बहुमत विकत घेऊन राज्य करण्याचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. लोकांना चांगले सरकार मिळविण्याचा अधिकार आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. त्या मताचा शेवटी नाइलाजाने का होईना आदर करावा लागला. भारतीय जनता पक्षाशी आमचे वैयक्तिक भांडण असण्याचे कारण नाही. पण जाता जाता फडणवीसांनी आमच्यावर दोषारोप केले आहेत. शिवसेना सत्तेची लाचार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हे सांगणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा म्हणाव्या लागतील. शिवसेनेस सत्तेची लाचार म्हणणाऱयांनी स्वतःच्या अंतरंगातील जळमटे आधी पाहावीत. अजित पवारांशी त्यांनी ‘पाट’ लावलेला चालतो, पण
शिवसेनेस जे द्यायचे ठरले होते
त्यावर पलटी मारून काय मिळवले? सत्तेची लाचारी नसती व दिलेल्या शब्दास जागण्याची इच्छा असती तर ही वेळ भाजपवर आली नसती. तुम्ही खोटे बोललात व शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थैर्य व स्वाभिमान यासाठी आम्ही तीन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे 2014 साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपने घेतला होता तेव्हा ती लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपचे वैफल्य असे आहे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आले नाही. महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव! आम्ही 162 चा आकडा दाखवूनही तो खोटा ठरवण्याचा घृणास्पद प्रयत्न त्यांनी केला. आता बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीसांचे सरकार पळून गेले. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती. अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल!