भाजपा-पीडीपीची युती लव्ह जिहाद होता का?


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेसोबत असल्याच सूचक वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. “सर्वच नेत्यांचा एकमेकांशी प्रेमाचा संवाद सुरू आहे. प्रत्येक नेत्याला राज्याविषयीच्या कर्तव्यांची जाण आहे. राज्यात अस्थिरता राहू नये. राष्ट्रपती राजवटी आणण्याचा प्रयत्न होतोय. त्याला आव्हान द्यावं यासाठी शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं एकमत आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, भाजपा पीडीपी युती लव्ह जिहाद होता का?,” असा सवाल राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेला सत्ता स्थापनेच आमंत्रण मिळाल्यानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलं. राऊत म्हणाले, “भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही. याचं खापर शिवसेनेवर फोडण चुकीचं आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कार्यवाही झाली असती तर ही वेळ भाजपावर आली नसती. प्रसंगी विरोधी पक्षात बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही, अशी अंहकाराची भूमिका घेतल्यानं भाजपावर ही वेळ आली आहे. स्थिर सरकार देण्याची जबाबदारी भाजपाचीच होती,”असं राऊत यांनी भाजपाविषयी बोलताना स्पष्ट केलं.
“ज्यांनी खोटं बोलून अंहकाराच्या भूमिकेतून राज्याला या परिस्थितीत ढकललं ते महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. त्यामुळं भाजपाचा मुख्यमंत्री नको असं गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख पक्षांची भूमिका आहे. त्यामुळं काही मुद्यांवर मतभेद असतात. भाजपासोबतही आहेतच. पण, राष्ट्रवादी, काँग्रेस हे पक्ष अफगाणिस्तानात तयार झालेले नाही. सर्व पक्षांचं राष्ट्राच्या उभारणीत योगदान आहे. तत्वाच्या गोष्टी आम्हाला सांगू नये, तसं असेल तर भाजपा-पीडीपीची युती लव्ह जिहाद होता का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.
“जे पक्ष भाजपा नको असं म्हणत होते, हा त्या पक्षांच्या कसोटीचा काळ आहे. जे बोलत होते. ते करून दाखवण्याची वेळ आली आहे. भूमिकेला चिटकून राहण्याच आवाहन मी त्यांना करेल. शेतकरी, बेरोजगारी, महागाई या किमानसमान सूत्रांवर हे सरकार स्थापन होणार आहे,” असा दावा राऊत यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post