'राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच'


एएमसी मिरर : वेब न्यूज
सत्तावाटपावरुन भाजपा-शिवसेनेमध्ये आधीच संघर्षाचं चित्र असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' या सदरातून भाजपला थेट आव्हान दिले आहे. राष्ट्रपती राजवट लादण्याची हिंमत भाजपाने एकदा करून पाहावीच, अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्याला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेय. रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत?असा सवालही राऊत यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर, महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते. युतीतील आजची कटुता दिसली नसती, अशी खंत देखील राऊत यांनी व्यक्त केलीय.

‘रोखठोक’मध्ये नेमकं काय म्हटलंय, वाचा सविस्तर :
‘अहंकाराच्या चिखलात रथचक्र! एक सरकार बनेल काय?’
कलियुगच खोटे आहे. स्वप्नात दिलेला शब्द पाळण्यासाठी राजा हरिश्चंद्राने राज्य सोडले, पित्याने सावत्र आईला दिलेल्या शब्दापोटी श्रीरामाने राज्य सोडून वनवास पत्करला. त्याच हिंदुस्थानात दिलेला शब्द फिरवण्याचे ‘कार्य’ भारतीय जनता पक्षाने पार पाडले आहे. हे सर्व एका मुख्यमंत्रीपदावरून घडत आहे व राज्यात सत्तास्थापना खोळंबली आहे. उद्धव ठाकरे यांनी 31 तारखेच्या दुपारी स्पष्टपणे सांगितले, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन आलोय असे कुणी समजू नये. त्यांचे हे विधान ज्यांना समजले त्यांनी पुढच्या रामायणाचे भान ठेवायला हवे. मीच पुन्हा मुख्यमंत्री होईन असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. देवेंद्र पुन्हा मुख्यमंत्री होतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले. तरीही रथाचे चाक अडकले आहे व भाजपचे संकटमोचक कृष्ण अमित शहा हे रथचक्र उद्धारासाठी अद्यापि पुढे का आले नाहीत, हे रहस्य आहे. महाराष्ट्राचे राजकारण विधानसभा निवडणुकीनंतर गोंधळलेल्या अवस्थेत आहे. दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्राचे राजकारणही एकाच व्यक्तीभोवती फिरणारे, बाकीचे सर्व शोभेसाठी, आवश्यक तेव्हा व आवश्यक तेवढेच बोलण्यासाठी अशा स्वरूपाचे झाल्याने राजकीय चर्चाच संपली. अशा वेळी राजकीय चर्चा घडत नाहीत व निवडणुकीत एकत्र येऊन लढलेल्या दोन पक्षांना सत्तास्थापनेचा जनादेश मिळूनही रथाचे चाक अहंकाराच्या चिखलात अडकून पडते.
‘रेकॉर्ड’वर पलटी
महाराष्ट्राचे निकाल स्पष्ट आहेत. भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या. शिवसेना सोबत नसती तर हा आकडा 75 च्या वर गेला नसता. ‘युती’ होती म्हणून गती मिळाली. ‘युती’ होते तेव्हा कुणाच्या किती जागा आल्या यापेक्षा ‘युती’ करताना निवडणुकीआधी काय करार झाले होते ते महत्त्वाचे असते. शिवसेनेला 56 जागा मिळाल्या, पण श्री. फडणवीस हे आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेस अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाहीत. पदांचे समान वाटप असे ‘रेकॉर्ड’वर बोलल्याचे पुरावे असताना भाजपचे देवेंद्र पलटी मारतात व पोलीस, सीबीआय, ईडी, आयकर विभागाच्या मदतीने सत्तास्थापनेसाठी हालचाली करतात. हा लोकशाहीचा कोणता प्रकार? इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादली तो दिवस काळा दिवस म्हणून पाळणाऱ्यांकडून हे असे घडावे याचे आश्चर्य वाटते. 24 तारखेस निकाल लागले त्या दिवशी संध्याकाळीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठय़ा मनाने ‘मातोश्री’वर जाऊन पहिली चर्चा सुरू करायला हवी होती. वातावरण तापलेच नसते, पण 105 कमळांचा हार म्हणजे अमरपट्टा. तो कोण हिरावून घेणार? 2014प्रमाणे शिवसेना सर्व गोष्टी मान्य करील या भ्रमात सगळे राहिले. तो भ्रम उद्धव ठाकरे यांनी पहिल्या आठ तासांत दूर केला. 2014 साली शिवसेना सत्तेत गेली. आता ती घाई शिवसेना करणार नाही व फरफटत जाणार नाही हे धोरण त्यांनी ठेवले व वायफळ चर्चेचे दरवाजेच बंद केले. ‘शिवसेनेशिवाय बहुमत असेल तर सरकार बनवा, मुख्यमंत्री व्हा!’ हा सरळ संदेश श्री. उद्धव ठाकरे यांनी दिला. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पक्षात आज कोणीही विरोधक आणि मुख्यमंत्रीपदाचा दावेदार उरलेला नाही. हा एक विचित्र योगायोग आहे. श्री. गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे दिसले असते व मुंडे मुख्यमंत्री झालेच असते तरी युतीतील आजची कटुता दिसली नसती. श्री. मुंडे यांचे निधन झाले. एकनाथ खडसे यांना आधी डावलले व संपवले. त्यासाठी गिरीश महाजन यांचे प्रयोजन केले. आता ‘मुक्ताईनगर’ मतदारसंघातून खडसे यांच्या मुलीलाही पराभूत केले. पंकजा मुंडे पराभूत झाल्या. विनोद तावडे यांना घरी बसवले व चंद्रकांत पाटील यांची कोंडी केली. तरीही देवेंद्र फडणवीस हे सरकार स्थापन करू शकले नाहीत व एक-एक अपक्ष गोळा करीत आहेत, पण या गोळाबेरजेतून 145 जमतील काय?
हे आहेत पर्याय
महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत काय घडू शकेल ते पहा-
डाव 1 – शिवसेनेस वगळून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा करू शकते. भाजपकडे 105 आमदार आहेत. 40 जास्त लागतील. ते शक्य झाले नाही तर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांचे सरकार कोसळेल. 40 जास्त मिळवणे हे अशक्यच दिसते.
डाव 2 – 2014प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्षास पाठिंबा देईल. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल. त्या बदल्यात सुप्रिया सुळे यांना केंद्रात व अजित पवारांना राज्यात पद दिले जाईल.
पण 2014 साली केलेली ही घोडचूक श्री. पवार पुन्हा करतील याची सुतराम शक्यता नाही. पवारांना भाजपविरोधात यश मिळाले आहे व महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले आहे. आज ते शिखरावर आहेत. त्यांच्या यशाची माती होईल.
डाव 3 – भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यावर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) व इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा 170पर्यंत जाईल. शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री करू शकेल व सरकार चालवण्याचे साहस त्यांना करावे लागेल. त्यासाठी तीन स्वतंत्र विचारांच्या पक्षांना समान किमान सामंजस्याचा कार्यक्रम तयार करून पुढे जावे लागेल. अटलबिहारी वाजपेयींनी जसे सरकार दिल्लीत चालवले तसे सगळय़ांना धरून पुढे जावे लागेल. त्यात महाराष्ट्राचे हित आहे.
डाव 4 – भारतीय जनता पक्ष व शिवसेनेस नाइलाजास्तव एकत्र येऊन सरकार स्थापन करावे लागेल. त्यासाठी दोघांनाही चार पावले मागे यावे लागेल, शिवसेनेच्या मागण्यांवर विचार करावा लागेल, मुख्यमंत्रीपदाची विभागणी करावी लागेल व हाच एक उत्तम पर्याय आहे; पण अहंकारामुळे ते शक्य नाही.
डाव 5 – ईडी, पोलीस, पैसा, धाक यांचा वापर करून इतर पक्षांचे आमदार फोडून भाजपास सरकार बनवावे लागेल (त्यासाठी ‘ईडी’चा एक प्रतिनिधी मंत्रिमंडळात सामील करावा लागेल), पण ‘पक्षांतर’ करणाऱ्यांची काय अवस्था झाली हे मतदारांनी दाखवून दिल्याने फाटाफूट घडवून बहुमत मिळवणे, मुख्यमंत्रीपद मिळवणे सोपे नाही. या सगळय़ात मोदी यांच्या प्रतिमेचे भंजन होईल.
राष्ट्रपती राजवट?
सरकार कोणाचेही आले तरी विधानसभेत विरोधकांच्या तोफांना तोंड देणे अवघड ठरेल अशी माणसे विरोधी बाकांवर निवडून आली आहेत. 2014 ला विरोधी पक्ष हतबल, कमकुवत आणि निराश होता. त्यांना सूर्यप्रकाशातही अंधार दिसत होता व आत्मविश्वास संपूर्ण हरवून बसले होते. याच्या नेमके विरुद्ध चित्र आज आहे. जयंत पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अजित पवार, जितेंद्र आव्हाडांसह शंभरावर विरोधकांची फौज सरकारला रोखण्यासाठी उभी आहे. नोकरशाही यावेळी वेडीवाकडी, दबावाखालची कामे करणार नाही व कोणी केले तर त्या फायलींच्या प्रती तासाभरात विरोधकांच्या हाती जातील असा दबाव दिसत आहे. मागच्या सरकारची ‘कामे’ नव्या विरोधकांच्या कचाटय़ात सापडू नयेत म्हणजे झाले. बहुमतासाठी सत्तास्थापनेसाठी जमवाजमव करताना ”मी मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री काहीही करू शकतो” या भाषेला त्याच पद्धतीने उत्तर देणारा विरोधी पक्ष हातात तलवारी काढून सज्ज आहे. सत्ता स्थापन व्हावी व सरकारने काम करावे ही सगळय़ांचीच इच्छा; पण ”आम्ही नाही तर कुणीच नाही” या अहंकारातून सगळं अडलं आहे. महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. कुणाची जागीर नाही. आमची सत्ता आली नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येईल, अशी भीती श्री. सुधीर मुनगंटीवार दाखवतात हा त्याच अहंकाराचा भाग. राष्ट्रपती राजवट लादून राज्य करणे हा भाजपचा शतकातील सर्वात मोठा पराभव ठरेल. अशी हिंमत एकदा करून पाहावीच!

Post a Comment

Previous Post Next Post