शिवसेना भूमिकेवर ठाम, लोकसभेला जे ठरलं तोच प्रस्ताव : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
ठरलेली गोष्ट नाकारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, शिवसेना आजही भूमिकेवर ठाम आहे. लोकसभेला जे ठरलं तोच प्रस्ताव आहे. नवा प्रस्ताव काय पाठवायचा, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर दिली आहे. ‘एबीपी माझा’ वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.
भाजपाची बैठक झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करू, पण शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपाचं दरवाजे खुले असून, प्रस्ताव आल्यास विचार करू, असं पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या विधानावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करू हे भाजपाचं म्हणणं फार समंजस निवेदन आहे. त्यांनी खुप उशीरा ते केलं. ही भूमिका आधी घेतली असती तर सत्ता स्थापनेचा निर्णय लांबला नसता. पण, शिवसेनेकडून प्रस्ताव आला नाही, असं कसं म्हणता येईल. शिवसेना आजही भूमिकेवर ठाम आहे. लोकसभेला जे ठरलं तोच प्रस्ताव आहे. ठरल्या प्रमाणे होईल आणि ठरल्या प्रमाणेच करा, एक काडीही जास्त नको, ही भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी आधीपासूनच घेतली आहे. त्यात तडजोड करणार नाही. चर्चा आमच्यामुळं थांबलेली नाही. ठरलेली गोष्ट नाकारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. आम्ही कधीही शब्द बदलले नाही. मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करणार हे भाजपानं लिहून पाठवावं.

Post a Comment

Previous Post Next Post