'असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात'


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात, अशा शब्दात शिवसेनेने
भाजपवर हल्ला चढविला आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून ऑपरेशन लोटसवरही टीका करण्यात आली आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात, वाचा पूर्ण लेख :

काळजी नसावी!

फडणवीस यांच्यापाशी बहुमत होते तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे का केली? नितीन गडकरी यांनी क्रिकेटच्या खेळाची उपमा त्यांनी या सर्व प्रकारास दिली. आम्हीही त्यांना सांगतो, कितीही ‘फिक्सिंग’ झाले तरी ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही. बहुमत सिद्ध होईल तेव्हा सत्य जिंकल्याचा आनंद महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील तमाम जनतेला आम्ही फक्त इतकंच सांगू की, काळजी नसावी!

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा बाजार सत्तांधांनी मांडला आहे. महाराष्ट्राशी ज्यांचे भावनिक नाते अजिबात नाही असेच लोक शिवरायांच्या महाराष्ट्राच्या इज्जतीची अशी लक्तरे काढू शकतात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत, महाराष्ट्राच्या निर्मितीत या मंडळींनी रक्ताचा सोडाच, पण घामाचा एक थेंबही गाळला नसल्याने हा राजकीय घोटाळा त्यांनी केला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून 162 आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. मग तीन पक्षांच्या आमदारांनी आपल्या सही-शिक्क्यांनिशी जे पत्र दिले, त्यावर मा. भगतसिंग राज्यपाल महोदयांची काय भूमिका आहे? एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला इतकेच आम्ही जाणतो, तर दुसऱ्या भगतसिंगांच्या सही-शिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले. महाराष्ट्रात जे घडले ती

‘चाणक्य–चतुराई’

किंवा ‘कोश्यारीसाहेबांची होशियारी’ असे म्हणणे हे सर्वस्वी चूक आहे. आमदारांचे अपहरण करणे व दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती? अजित पवार यांचा सर्व खेळ संपला तेव्हा ‘‘शरद पवार हेच आमचे नेते व मीच राष्ट्रवादीचा पाईक’’ अशी बतावणी त्यांनी केली. ही पराभूताची मानसिकता आहे. शरद पवार यांचे पुतणे म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत असाल तर आधी बारामतीच्या आमदारकीचा, पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन तुम्ही तुमचे स्वतंत्र राजकारण करायला हवे होते. पण काकांनी जे कमावले तेच चोरून ‘‘मीच नेता, माझाच पक्ष’’ असे सांगणे हा वेडेपणाचा कळस आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष दोनवेळा सोडला व स्वतःचा नवा पक्ष हिमतीने उभा केला. पन्नास वर्षे संसदीय राजकारणात टिकून राहणे सोपे नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे, वादळे झेलून ते उभे राहिले. पण भाजपने खटले दाखल करताच व ‘ईडी’च्या नावाने ब्लॅकमेल करताच अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीलाच सुरुंग लावला व त्यातला माल चोरून ते भाजपच्या वळचणीला गेले. एका जुन्या पत्राचा आधार घेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गट ताब्यात ठेवण्याची लटपट करीत आहेत व अजित पवारच कसे खरे

अशी बतावणी
भाजपचे नेते करीत आहेत. ‘‘हा अजित पवार कधी खोटं बोलत नाही’’ असं अजित पवार कालपर्यंत भाषणात सांगत. पण आता ते रोज खोटं बोलत आहेत. मुळात राज्यपालांनाच त्यांनी खोटे पत्र दिले आहे. सत्तास्थापना कोणीही करावी. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांना तो अधिकार आहेच. पण त्यासाठी घटना, राजभवन, सरकारी नियम यांची इतकीही पायमल्ली होऊ नये की, लोकांचा या सर्व संस्थांवरील विश्वासच उडून जावा. फडणवीस यांच्यापाशी बहुमत होते, तर मग बहुमताचा आकडा गाठण्यासाठी नव्या चांडाळ चौकडीची नियुक्ती ‘ऑपरेशन लोटस’च्या नावे का केली? ‘‘बाजारात आमदार स्वतःला विकायला तयार आहेत’’ असे त्या चौकडीचा एक सदस्य सरळ बोलतो. हे थैलीशाहीचेच राजकारण आहे. पैशांच्या बॅगा घेऊन ही चौकडी फिरत आहे. ही वेळ संघाचे स्वयंसेवक म्हणवून घेणाऱ्यांवर का यावी? गडकरी हे एक शहाणे राजकारणी आहेत, हा समज होता. तोसुद्धा गैरसमजच ठरला. क्रिकेटच्या खेळाची उपमा त्यांनी या सर्व प्रकारास दिली. आम्हीही त्यांना सांगतो, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. कितीही ‘फिक्सिंग’ झाले तरी ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदाचा पराभव जुगाऱ्यांना करता येणार नाही. बहुमत सिद्ध होईल तेव्हा सत्य जिंकल्याचा आनंद महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. राज्यातील तमाम जनतेला आम्ही फक्त इतकंच सांगू की, काळजी नसावी!

Post a Comment

Previous Post Next Post