'एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला आणि दुसऱ्याने..'
एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला इतकेच आम्ही जाणतो. तर दुसऱ्या भगतसिंगांच्या सहीशिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले गेले, अशी जळजळीत टीका शिवसेनेने  केली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे.
“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला, असा आरोप करण्यात आला आहे.
मग तीन पक्षांच्या आमदारांनी आपल्या सही-शिक्क्यांनिशी जे पत्र दिले, त्यावर मा. भगतसिंग राज्यपाल महोदयांची काय भूमिका आहे? अशी विचारणाही केली गेली आहे. महाराष्ट्रात जे घडले ती ‘चाणक्य–चतुराई’ किंवा ‘कोश्यारीसाहेबांची होशियारी’, असे म्हणणे हे सर्वस्वी चूक आहे. आमदारांचे अपहरण करणे व दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती?, असा टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post