राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभागृहातील कामाचे मोदींकडून कौतुक


एएमसी मिरर : वेब न्यूज
संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सोमवारपासून प्रारंभ झाला. यावेळी राज्यसभेच्या २५० व्या ऐतिहासिक अधिवेशनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या पक्षांचे कौतुक केले. या दोन्ही पक्षांकडून इतर पक्षांनी काहीतरी शिकायला हवे असे मोदी यावेळी म्हणाले.
मोदी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन्ही पक्षांनी परस्परांमध्ये ठरवले होते की, कोणतेही मुद्दे असले तरी गोंधळ घालण्यासाठी वेलमध्ये जायचे नाही. असा गोंधळ त्यांनी घातला नाही तरीसुद्धा त्यांच्या राजकीय वाटचालीत कोणताही अडथळा आला नाही. सभागृह हे संवादासाठी असले पाहिजे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वादविवाद झाले तरी अडथळ्यांऐवजी संवादाचा मार्ग निवडायला हवा.
मागील २५० सत्रांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरं पाहिली, राज्यसभेची २५० सत्रं म्हणजे एक विचारधारा आहे असेही मोदी यावेळी म्हणाले. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला आहे, इतिहास घडताना पाहिला आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी या सभागृहाचे नेतृत्त्व केलं आहे ही बाबही अभिमानास्पद असल्याचे मोदी म्हणाले. आत्तापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
दरम्यान, संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे २०१९चे शेवटचे अधिवेशन असून अत्यंत महत्वाचे आहे. या सभागृहाच्या माध्यमातून देशवासियांसाठी देखील एक जागृतीची संधी बनू शकते. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज योग्य पद्धतीने चालवण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मिळेल अशी मला आशा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post