देशाला भाजपपासून धोका आहे, सोनिया गांधींचं उद्धव ठाकरेंना पत्र


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तीन पक्ष मिळून सरकार स्थापन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (दादर येथील शिवाजी पार्क) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आजच्या शपथविधीला राज्यासह देशभरातून अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत. परंतु तब्येत बरी नसल्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मात्र या शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत. दरम्यान शपथविधीपूर्वी सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणारं पत्र पाठवलं आहे.
सोनिया गांधी यांनी पत्रात लिहिले आहे की, देशाला भाजपपासून मोठा धोका आहे. देशातील राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. भाजपची देशात एकाधिकारशाही सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. दुसऱ्या बाजूला देशाची अर्थव्यवस्थादेखील कोलमडली आहे. हे सर्व सावरायला हवं.
सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे की, तुमच्या नव्या राजकीय कारकिर्दीला माझ्याकडून खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील जनतेचं हित आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार काम करेल, अशा अपेक्षा मी ठेवल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post