हायकमांडच्या निर्णयानुसारच आमची पुढची वाटचाल : थोरात


एएमसी मिरर : वेब न्यूज 
काँग्रेसच्या सर्व आमदारांबरोबर चर्चा केली आहे. यावेळी आमचे प्रभारी व सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सर्वांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. शेवटी या संदर्भात निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार आहे. जो निर्णय हायकमांड देईल त्यानुसार आमची पुढची वाटचाल असणार आहे. तसेच, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचेही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे अहमद पटेल हे देखील आज जयपूरमध्ये दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अगोदर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जु खर्गे यांनी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार असल्याच वक्तव्य केलं आहे. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे, आमचा देखील तोच निर्णय आहे. मात्र हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल, असेही खर्गे यांनी स्पष्ट केले आहे. जयपुरात काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर खर्गे यांनी माध्यमांना ही माहिती दिली आहे. त्यामुळे काँग्रेसशिवाय आता शिवसेना सत्तेत कशी बसणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post