अयोध्या निकालावर भारतीयांच्या भूमिकेचं मोदींकडून कौतुक


एएमसी मिरर : वेब न्यूज
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केलं आहे. यावेळी मोदींनी अयोध्या निकालानंतर भारतीयांच्या भूमिकेचं कौतुक केलं. भारताची लोकशाही मजबूत आहे, आज पुन्हा एकदा दिसून आलं. विविधतेत एकतेचा मंत्र उजळून निघाला आहे. 9 नोव्हेंबर हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. भारताची न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र असून कोणत्याही कठीण पेचप्रसंगावर कायद्याने तोडगा काढणं शक्य आहे, हे आज दिसून आलं, असं मोदींनी म्हटलं आहे.
अयोध्या प्रकरणाला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची जगात ओळख आहे, मात्र जगाने आज ते अनुभवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ज्या खुल्या मनाने सर्वांनी मान्य केला, यातून भारतीय संस्कृती झळकते. भारतातील विविधतेतील एकता आज जगाला दिसली आहे.
राम मंदिराचं निर्माण करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायाल्याने दिला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्र निर्मितीची आपली जबाबदारी वाढली आहे. अयोध्या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. नव्या भारतात कटुता, भीतीला थारा नाही. आता नव्या पिढीने नव्या भारताची सुरुवात करावी, असंही मोदी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post