नदीत पडलेल्या 'त्या' वाघाचा अखेर मृत्यू


एएमसी मिरर : वेब न्यूज
चंद्रपूर जिल्ह्यातील सिरणा नदीत जायबंदी होऊन पडलेल्या वाघाचा गुरुवारी (7 नोव्हेंबर) पहाटे अखेर मृत्यू झाला आहे. मात्र वाघाच्या या मृत्यूमुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. वनविभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा तज्ज्ञांनी आरोप केला आहे.
चंद्रपूर जिल्हा म्हणजे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक वाघ असलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे. माजरी या गावाशेजारी असलेल्या सिरणा या नदीत एक वाघ पडून असल्याचे लक्षात आले. वाघ पुलावरून खाली पडल्याने जबर जायबंदी झाला होता. मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती.
बुधवारी (6 नोव्हेंबर) सकाळपासून वाघाला वाचविण्यासाठी मोहीम सुरु करण्यात आली. नदीच्या एका बाजूने रस्ता तयार करण्यात आला आणि पिंजऱ्यामध्ये वाघ जेरबंद होईल असा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रयत्नात वाघ पिंजऱ्यात येण्याऐवजी आणखीनच जखमी झाला. अंधार पडल्यामुळे काल संध्याकाळी ही रेस्क्यू मोहीम थांबविण्यात आली. गुरुवारी (7 नोव्हेंबर) सकाळी रेस्क्यू मोहीम सुरू होण्याआधीच वाघाचा मृत्यू झाला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याचा आरोप या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.
मात्र या सर्व आरोपांचे वनविभागाने खंडन केले आहे. वनविभागाचे उपविभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे म्हणाले, काल ज्या परिस्थितीत वाघ जायबंदी झाला होता. त्या परिस्थिती मध्ये त्याला डार्ट मारून बेशुध्द करणे किंवा जाळीत बंद करणे शक्य नव्हते आणि त्यामुळे त्यांनी प्राप्त परिस्थितीत वाघाला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post