शिवसेना आमदारांची बैठक; उद्धव ठाकरे मालाड येथील हॉटेलमध्ये दाखल


एएमसी मिरर : वेब न्यूज 
राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची बैठक होत असून, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील मालाड येथील हॉटेल द रिट्रीट येथे दाखल झाले आहेत. सत्ता स्थापनेच्यादृष्टीने उद्धव ठाकरे या आमदारांबरोबर नेमकी काय चर्चा करणार आहेत? कोणता निर्णय घेणार आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना सरकारला पाठिंबा द्यावा, म्हणून काँग्रेस आमदारांनी पक्षाच्या नेत्यांवर दबाव वाढविला आहे. जयपूरमध्ये असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या नेत्यांकडे ही आग्रही मागणी लावून धरली आहे. काँगेसच्या ४० आमदारांनी एकमातांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठींबा द्यावा, असं बैठकीत सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बळावर शिवसेना सरकार सत्तास्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सत्तास्थापनेसाठी भाजपाबरोबर जाण्यासाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी नकार दर्शवला आहे. तर, काँग्रेसच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेसाठी अनुकुलता दर्शवली जात आहे. दुसरीकडे भाजपाच्या कोअर कमिटीची फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर भाजपा काय निर्णय घेणार आहे, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post