काळजी करू नका, आपली युती बरीच पुढे जाईल : उद्धव ठाकरे

फोटो सौजन्य : एएनआय

एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली, विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदारांच्या या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीस मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्याकडे संख्याबळ आहे, आपण निश्चित बहुमत सिद्ध करू असे सांगितले. तसेच, काळजी करू नका, आपली युती बरीच पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीस शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची देखील उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी या बैठकीसंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीस मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थितीत होते. आपल्याकडे बहुमत आहे, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी आमदारांना दिला आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालयचा उद्या निकाल आहे, त्यानुसार पुढे काय करायचे हे ठरवले जाणार आहे. पण जर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आलीच तर निश्चितपणे संख्याबळ आपल्याबाजूने आहे. त्यामुळे आपण नवीन सरकार स्थापन करू असे बैठकीत सांगण्यात आले असल्याचेही आमदार मलिक यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post