'तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पर्यायी सरकारचा विचार करेल'


एएमसी मिरर : वेब न्यूज
सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपाची सरकार स्थापन्याची तयारी आहे का, अशी विचारणा करणारे पत्र शनिवारी राज्यपालांनी पक्षाला पाठवले आहे. भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केल्यास विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात मतदान करेल. सत्तास्थापनेवेळी जर युतीमधील पेच न सुटल्यास भाजपा सरकार पाडण्यासाठी शिवसेना विरोधात मतदान करणार का, हे आम्हाला पाहायचे आहे. तसे झालेच तर नंतर पर्यायी सरकार कसे देता येईल, याचा विचार राष्ट्रवादी करेल, असे नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडे बहुमताचा आकडा आहे की नाही, याची राज्यपालांनी खात्री करून घ्यायला हवी नाहीतर सत्तेसाठी आमदारांचा घोडेबाजार मांडला जाण्याची भीती आहे, असेही मलिक म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बोलावण्यात आली असून या बैठकीला पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत, असेही मलिक यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post