‘हो माझं शरद पवारांशी बोलणं झालं. मी काहीही लपवत नाही’


एएमसी मिरर : वेब न्यूज
राष्ट्रवादी आणि शिवसेनेची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. यावरुनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पवारांबरोबर बोलणे झाले का असा सवाल पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आला तेव्हा ते संतापले. ‘हो माझं शरद पवारांशी बोलणं झालं. मी काहीही लपवत नाही’ असं उत्तर राऊतांनी दिले. इतकचं नाही तर आमच्या चर्चेने ज्यांना पोटशूळ उठलाय त्यांच्या चर्चांबद्दल आम्हाला ठाऊक आहे असा टोलाही राऊत यांनी भाजपाचे नाव न घेता लगावला आहे.
सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नसल्याने राज्यातील अनेक नेत्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बोलण्यासाठी धाव घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमावारी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. या भेटींमुळे राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींचा वेग आला असला तरी राज्यात कोणाची सत्ता येणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना पवारांबरोबर फोनवरुन चर्चा झाल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थोड्या चढ्या आवाजात होकारार्थी उत्तर देत ‘शरद पवारांशी बोलणं काही गुन्हा नाही,’ असं स्पष्ट केलं. माझं बोलणं झालं शरद पवारांशी. मी काही लपवत नाही. शरद पवारांशी बोलणं किंवा संपर्क करणं हा काही गुन्हा आहे का? ते महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. देशाचे नेते आहेत पवार. या राज्यात त्यांचे ५५ च्या आसपास आमदार निवडून आले आहेत. त्यांच्याशी का बोलू नये. त्यांच्याशी सर्वांनी बोलावं, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

तसेच पुढे बोलताना राऊत यांनी भजापाचे नाव न घेता आमच्यातील चर्चेने काहींना पोटशूळ उठला आहे असा टोला लगावला. “पवारांशी कोणकोण बोलतयं हे मला माहिती. ज्यांना शरद पवारांशी आम्ही बोलल्याचा पोटशूळ उठलाय ते सुद्धा शरद पवारांना कसा आणि कुठे फोन करायचा प्रयत्न करतायत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?,” अशा शब्दांमध्ये राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.

Post a Comment

Previous Post Next Post