सूडाचं राजकारण करणं भाजपाच्या संस्कृतीचा भाग नाही : अमित शाह


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : सूडाचं राजकारण करणं हा भाजपाच्या संस्कृतीचा भाग नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बुधवारी संसदेमध्ये म्हणाले. गांधी कुटुंबाला असलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीचे सुरक्षा कवच काढण्याच्या मुद्दावर ते बोलत होते. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा काढण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. “नियमानुसार एसपीजी सुरक्षा देशाच्या सर्वोच्च नेत्यांसाठी आहे. फक्त एका कुटुंबासाठी आधीच्या सरकारांनी या नियमामध्ये बदल केला” असा दावा अमित शाह यांनी केला.
“मला कोणाचे नाव घ्यायला लावू नका. पण दिल्लीत कोणीतरी ताशी १०० किलोमीटरच्या वेगाने गाडी चालवते आणि सुरक्षा मागे राहते. त्यावेळी कोणाला सुरक्षेची काळजी नसते” असे अमित शाह लोकसभेत म्हणाले. राजकीय कारणांमुळे हे सरकार आपल्या पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांची मुले राहुल आणि प्रियंका गांधी यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला. गांधी कुटुंबाची सुरक्षा काढलेली नाही. फक्त बदलली आहे असे अमित शाह यांनी चर्चेला उत्तर देताना सांगितले. गांधी कुटुंबाला आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
एसपीजी ही पंतप्रधानांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे. यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाली. तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीचे सुरक्षा कवच आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी १९८५ साली एसपीजी स्थापना करण्यात आली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना झाली.

Post a Comment

Previous Post Next Post