'ओवेसी आणि अल बगदादीमध्ये काहीही फरक नाही'


एएमसी मिरर : वेब न्यूज 
इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही, असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिल्यानंतर वसीम रिझवी यांनी अलीकडेच मंदिराच्या उभारणीसाठी ५१ हजार रूपयांची देणगी जाहीर केली आहे.
राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. “हा देश हिंदू राष्ट्राच्या वाटेवर निघाला आहे. त्याची सुरूवात अयोध्येतून झाली आहे. पुढे समान नागरी कायदा आणला जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य पण असमाधानी नाही, अशी भूमिका मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं घेतली आहे. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे, पण अचूक नाही. सत्याचा श्रद्धेवर झालेला विजय म्हणजे हा निकाल आहे. आम्ही बंधुत्वाच्या विरोधात नाही. पाच एकर जमीन आम्हीही घेऊ शकतो. ही लढाई हक्कासाठी आहे. त्यामुळं पाच एकर जागेची भीक नको,” असं ओवेसी म्हणाले होते.
त्यावरून शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली आहे. रिझवी म्हणाले, “असदुद्दीन ओवेसी आणि दहशतवादी संघटना इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी यांच्या कोणताही फरक नाही. बगदादीकडं लष्कर आहे. शस्त्रास्त्र आणि स्फोटकं आहेत. ज्याचा वापर दहशतवाद पसरवण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे ओवेसी आपली भाषणांच्या माध्यमातून दहशत निर्माण करत आहेत. ते मुस्लिमांना दहशत आणि रक्तपाताच्या दिशेनं ढकलत आहेत. ओवेसींवर बंदी आणण्याची वेळ सध्या आली आहे, असं ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post