प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून


एएमसी मिरर : वेब न्यूज 
प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला आहे. उच्च शिक्षित पत्नीने लष्करात सेवेत असलेल्या पतीला विष देऊन ठार केले. शीतल संजय भोसले आणि योगेश कदम अशी या दोघांची नावं आहेत. वाकड पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. संजय भोसले असं खून झालेल्या पतीचं नाव  आहे. ते भारतीय लष्करात कार्यरत होते.  संजय आणि शीतल यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शीतल आणि तिचा प्रियकर योगेश कदम (वय-२९) हे दोघे गेल्या दोन वर्षापासून एकमेकांवर प्रेम करत होते. योगेश शीतलच्या घरासमोरच रहात होता.  मृत्यू झालेले संजय हे आसाम येथे देशसेवेसाठी कार्यरत होते. त्यामुळे ते सहसा काही महिन्यांनी घरी परतत. परंतु, संजय यांना योगेश आणि पत्नी शीतल यांच्या प्रेम प्रकरणाची चाहूल लागली होती. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण झाले होते. अखेर वैतागून संजय आणि शीतल दुसरीकडे भाड्याने राहण्यास गेले जेणेकरून योगेश आणि पत्नी शीतल यांचा संबंध येणार नाही.
असं असताना पुन्हा संजय हे आसाम येथे कर्तव्यावर गेल्यानंतर शीतल आणि योगेश हे भेटत. त्यांनी प्रेमात अडथळा ठरत असलेल्या संजय यांचा काटा काढायचे ठरवले. याच महिन्यात संजय हे सुट्टीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राहत असलेल्या घरी परत आले. योगेश हा रासायनिक कंपनीत कामाला असल्याने त्याला विषारी औषधांची माहिती होती. त्याने प्रेयसी शीतल ला सोडिअम साइनाइड आणून दिले. शीतल संजय यांना रात्री उशिरा पाण्यात विषारी रसायन देऊन त्यांचा खून केला. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची असल्याने प्रियकर योगेश ने प्रेयसी शीतलसह मित्राच्या मदतीने मोटारीत घालून तो राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून परत घरी आले. सर्व जण घाबरले होते त्यामुळे त्यांनी मृतदेह हायवेच्या बाजूला बेवारस फेकून दिला.
दुसऱ्याच दिवशी संजय यांचा मृतदेह हा राजगड पोलिसांना मिळाला, संजय यांच्या खिशात मोबाईल असल्याने ते भारतीय लष्करात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पत्नी शीतल यांच्याशी संपर्क साधला. संजय यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्नी शीतल यांना तेथील पोलिसांनी तीन दिवस सतत बोलावले, त्यानंतर मात्र उलट सुलट प्रश्न विचारल्याने त्यांनी स्वतः प्रियकर योगेश च्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली. सात दिवसांनी खुनाचा गुन्हा उघड झाला. दरम्यान, शीतल यांना दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ बाबर हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post