हैदराबाद : बलात्कार प्रकरणातील आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार


एएमसी मिरर वेब टीम 
हैदराबाद : पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर सामुहिक बलात्कार करुन तिला निर्दयीपणे जाळून मारण्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील चारही आरोपींचा आज पहाटे तेलंगाणा पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिस तपासावेळी हे आरोपी पळून जात असताना त्यांना ठार करण्यात आले.
हैदराबाद जवळील चतनपल्ली गावात २६ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचे देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. या प्रकरणी ४ तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. या चारही आरोपींना पोलिसांनी ठार केले आहे. ज्या ठिकाणी महिला डॉक्टरला जाळून मारले तेथून जवळच पोलिसांनी आरोपींचा एन्काऊंटर केला.
हैदराबाद पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी महिला डॉक्टरला जाळून मारले तेथे आरोपींना नेले जात होते. त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. ही घटना आज पहाटे ३ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चेन्नकेसावूलू या चार आरोपींना ठार करण्यात आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले आहे.
२७ नोव्हेंबर रोजीच्या रात्री महिला डॉक्टरवर चौघांनी निर्दयीपणे अत्याचार केला. महिला डॉक्टर स्कुटी पार्क करत असल्याचे आरोपींनी पाहिले आणि त्यांच्या स्कुटीची हवा काढून टाकली. मदत करत असल्याचे भासवून त्यांनी मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरवर बलात्कार केला आणि त्यानंतर गळा दाबून त्यांची हत्या केली. हैदराबादजवळील चतनपल्ली गावात महामार्गाच्या लगत महिलेचे जळालेले प्रेत सापडले. पोलिसांनी अधिक तपास केला असता डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणात चार तरुणांना अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post