अहमदनगर : जलशक्ती अभियान उपक्रमाला जिल्ह्यात यश


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात शुद्ध व पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान व युनिसेफ भारत यांच्यामार्फत आणि केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जलशक्ती अभियानाला जिल्ह्यात मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यातील 8 गावांमध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांमधून 1 कोटी 92 लाख लीटर पाण्याची साठवण करण्यात आल्याचे अहवालातून समोर आले आहे.
जलशक्ती अभियान या मोहिमेत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 20 गटांची निवड करण्यात आली होती. यात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. मोहिमेचा पहिला टप्पा 8 जुलै ते 15 सप्टेंबर या कालावधीत पार पडला. तर दुसर्‍या टप्प्यात 1 ऑक्टोबर ते 30नोव्हेंबर या कालावधीत उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील 8 गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक सहाय्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे आदी विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. तसेच वनीकरणांच्या कामांसह ‘व्हीएसटीएफ’च्या प्रकल्पातील 8 गावांमध्ये प्रभावीपणे मोहीम राबविण्यात आली. या गावांमध्ये शोष खड्डे, पुनर्भरणासाठी विहिरी आणि कूपनलिका, पावसाचे पाणी जिरवणे आणि नाल्यांमधील गाळ काढणे अशी कामे करण्यात आली. या कामांवर 11 लाख 48 हजार रुपये खर्च करण्यात आला. मनरेगा निधी आणि बाह्य संस्थात्मक निधी यातून हा खर्च उभारण्यात आला. जिल्ह्यात 379 कुटुंबाना या कामांचा लाभ मिळाला. तसेच व्यापक वनीकरणाचा भाग म्हणून या 8 गावांमध्ये 11 हजार 300 वृक्षांची लागवड करण्यात आली.
मुख्यमंत्री ग्रामविकास प्रतिनिधींना जलशक्ती अभियानासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण किनवट येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन आणि विविध विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएसटीफच्या टीमने 23 बांधकाम प्रकल्पातून 1 कोटी 92 लाख लीटर पाण्याची साठवण केल्याने आगामी काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यात दोन तालुक्यांमध्ये मोठे काम
जामखेड आणि कर्जत या दुष्काळी गावांमधील 8 ग्रामपंचायतींमध्ये सध्या काम चालू आहे. येथील आठही विकास प्रतिनिधी जलशक्ती अभियानाच्या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणानंतर त्यांनी काम चालू असलेल्या गावांमध्ये जलशक्ती अभियानामधील कामांची अंमलबजावणी केली. प्रत्येक प्रतिनिधीने त्याच्या समूहातील ग्रामपंचायत सदस्यांना जलशक्ती अभियानाबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या गावासाठीच्या विकास योजनेतील कामांची माहिती दिली. गावातील सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून सर्व गाव या अभियानात सामील होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले. गावकर्‍यांना या अभियानात युनिसेफच्या तांत्रिक सहाय्यासह पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि बारामती ऍग्रो या संस्थांचे मोठे सहकार्य मिळाले.

अभियान यशस्वीतेसाठी समाजमाध्यमांचा वापर
काम चालू असताना जिल्हा आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी आणि अधिकार्‍यांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार करून आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांशी समन्वय राखला. कामाच्या प्रगतीची माहिती एकमेकांना दिली. जिल्हा पातळीवर नियोजन आणि समन्वय ठेवल्यामुळे त्यांना निधीसाठी पाठपुरावा करणे आणि उपलब्ध सामग्रीचा वापर करणे शक्य झाले. हा उपक्रम आपला स्वतःचा आहे, या भावनेतून गावकर्‍यांनी निधीतील तफावत लोकवर्गणी गोळा करून भरून काढली.

Post a Comment

Previous Post Next Post