अहमदनगर : भाजप नगरसेविकेचा उपोषणाचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सावेडी उपनगरातील प्रभाग पाचमधील बहुतांशी वसाहतींमध्ये घंटागाड्या येत नसल्याने व अनेक पथदिवे बंद असून, त्याची दुरुस्ती होत नसल्याने भाजप नगरसेविका सोनाबाई शिंदे यांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे.
प्रभाग पाचमधील सिव्हील हडको, गायकवाड कॉलनी, बिशप लॉईड कॉलनी, भाग्योदय सोसायटी, साधना हौसिंग सोसायटी, मंगल सोसायटी, गुलमोहर रोड परिसर, प्रोफेसर कॉलनी परिसर, सोनानगर, पोलिस कॉलनी, अयप्पा मंदीर, तार कॉलनी, श्रेयस कॉलनी, ओंकार कॉलनी, वृंदावन कॉलनी, निरंजन कॉलनी, वैभव कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, शिवकृपा कॉलनी, वैदुवारी, लोकमान्य नगर, कुष्ठधाम रोड, चिंतामणी कॉलनी, हेरंब कॉलनी, जयेश मार्केट, श्रमिक नगर, मेघराज कॉलनी, भिंगारदिवे मळा, अशोकनगर, सपकाळ हॉस्पिटल रोड, सहकारनगर, मोरया मंगल कार्यालय परिसर, आनंदबन कॉलनी, प्रतिभा कॉलनी, रेणावीकर कॉलनी आदी ठिकाणी कचरा संकलनासाठी घंटागाडी येत नाही. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, नागरिक ओपन प्लॉटवर, रस्त्यावर कचरा टाकतात. हा कचराही उचलला जात नसल्याने परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.
तसेच या परिसरांसह पाईपलाईन रोड, सावेडी नाका, जॉगिंग पार्क रोड, झोपडी कॅन्टीन ते तोफखाना पोलिस स्टेशन, प्रेमदान चौक ते प्रोफेसर कॉलनी आदी भागातील पथदिवे पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे मंगळसूत्र चोर्‍या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. मनपाने याची दखल घेऊन 13 डिसेंबरपर्यंत उपाययोजना न केल्यास 17 डिसेंबर पासून मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा नगरसेविका शिंदे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post