अहमदनगर : ‘भाजप’ला उत्तर व दक्षिणेसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष मिळणार


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुकांचा कार्यक्रम सुरु आहे. यात मंडलाध्यक्ष निवडी सध्या सुरू असून, त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र, नगर जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये आता दोन जिल्हाध्यक्ष देण्याचा निर्णय पक्षपातळीवर घेण्यात आला आहे. उत्तर व दक्षिण जिल्ह्यासाठी स्वतंत्र अध्यक्ष असतील, असे पदाधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा पराभव सहन करावा लागला. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी कर्डिले या चार विद्यमान आमदारांना पराभव झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांची संख्याही घटली आहे. या निवडणुकीनंतर पक्षात आता संघटनात्मक निवडणुकीचे वारे वाहत आहे. शनिवारी व रविवारी मंडलाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम असून, काही ठिकाणी निवडीही पार पडल्या आहेत. या निवडीनंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.
जिल्ह्यात नगर शहरासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष आहे. तर ग्रामीणसाठी स्वतंत्र अध्यक्ष आहे. आता ग्रामीण जिल्ह्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. यात नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष राहणार आहेत. पक्ष पातळीवर याबाबत निर्णय झाला असून, संघटनात्मक निवडी झाल्यानंतर दोन जिल्हाध्यक्षांची निवड होणार असल्याचेही पक्षातील वरीष्ठ पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

दक्षिणेतून प्रा.बेरड यांनाच पुन्हा संधी?
जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी येत्या 26 डिसेंबर रोजी बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या निवडी होणार असून, नगर दक्षिण जिल्ह्यासाठी सध्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे. उत्तर जिल्ह्यात विखे पिता-पुत्रांच्या सहमतीने अध्यक्ष निवडला जाईल, असे सांगितले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post