अहमदनगर : ‘प्रभाग 6 अ’च्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महानगरपालिकेच्या ‘प्रभाग 6 अ’च्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून, त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. नगरसह राज्यातील चार महापालिकांमधील रिक्त जागांसाठी एकत्रित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 27 डिसेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
पोटनिवडणुकीसाठी 4 ऑक्टोबर रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्याआधारावर तयार करण्यात येणार्‍या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध होणार आहेत. यादी प्रसिध्द झाल्यानंतर 3 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत आहे. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तर अंतिम मतदार याद्या 11 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.


प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, असेही आयुक्त मदान यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, शिवसेना नगरसेविका सारिका भुतकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 'अनुसूचित जमाती महिला' या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे. या जागेवर पोटनिवडणुकीची तयारी सुरू झाली असून, आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याच प्रभागात पोटनिवडणूक होणार असल्याने या निवडणुकीसाठी नवीन राजकीय समीकरणे उदयास येणार की, मनपातील भाजप-राष्ट्रवादीची युती या निवडणुकीतही कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post