नोकरीचे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कला शिक्षक या पदावर नियुक्ती करतो असे सांगुन विश्‍वास संपादन करून सहा लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाण येथे 15 जुन ते शुक्रवार दि.6 डिसेंबर 2019 दरम्यान घडली.
भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे (सर्व रा. आलमगीर, भिंगार), सचिव अनिल तुळशिराम शिंदे, उपाध्यक्ष मंगला अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपुर) व सदस्य राजु बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी.), संजय बन्सी साळवे, रेखा सुजय साळवे (दोघे रा. आलमगीर, भिंगार) यांनी हरेश्‍वर सारंधर साळवे (वय 35, रा. खांडगाव, ता. पाथर्डी) यास कला शिक्षक या पदावर नियुक्ती करतो, असे सांगुन मुलाखत घेऊन तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर दिली व वेळेवर पगार मिळण्याची हमी दिली. त्यानंतर त्यांनी संगनमत करून हरेश्‍वर साळवे यांच्याकडुन 6 लाख रूपये घेतले व शासनाची ऑर्डर मिळवुन देवू असे सांगुन विश्‍वास संपादन केला. त्यानंतर हरेश्‍वर यांना कोणत्याही प्रकारचे मानधन व पगार न देता त्यांची फसवणुक केली. हरेश्‍वर यांनी पगाराची मागणी केली असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा दम दिला.
याप्रकरणी हरेश्‍वर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 420, 406, 34, 506 प्रमाणे फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post