कचरामुक्त शहरासाठी विद्यार्थी, पालकांमध्ये जागृती करावी : महापौर बाबासाहेब वाकळे


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : माझे शहर स्वच्छ व सुंदर असले पाहिजे, अशी मानसिकता सर्वांनीच तयार करणे आवश्यक आहे. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक हे नवीन पिढी घडविण्याचे महत्वाचे काम करतात. त्यांनी विद्यार्थ, पालकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिल्यास जनजागृती होईल. शहर कचरामुक्त होण्यासाठी शाळांचे व शिक्षकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहर कचरामुक्त करण्यासाठी जनजागृती व उपाययोजनांसाठी शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा महापौर वाकळे यांच्या पुढकारातून आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेते स्वप्नील शिंदे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती लता शेळके, उपायुक्त सुनील पवार, नगरसेवक मनोज कोतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अजय चितळे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

महापौर वाकळे म्हणाले की, स्वच्छतेबाबत आपल्या शहराला चांगले मानांकन कसे मिळेल, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच आपल्याला पारितोषिक मिळू शकते. शाळांनी त्यांचा परिसर स्वच्छ राहील, यासाठी उपाययोजना कराव्यात. अशा शाळांना मनपाकडून पारितोषिके देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

उपायुक्त पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षणाबाबतची सविस्तर माहिती दिली. सर्व मुख्याध्यापक, शिक्षकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून त्याद्वारे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पालिकेला ओडीएफ प्लसचे मानांकन मिळाले असून, यापुढील काळात आपल्याला ‘ओडीएफ++’चे मानांकन मिळवायचे आहे. तसेच आता कचरामुक्त शहर करावयाचे आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी घरोघरी घंटागाडी पाठविण्याचे नियोजन सुरू आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमहापौर मालन ढोणे म्हणाल्या की, शहर स्वच्छतेबाबत सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांना शालेय परिसर व आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणेबाबत माहिती दिल्यास निश्चीतच शहर स्वच्छतेमध्ये भर पडेल.

नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, सर्वांच्या सहकार्याने थ्री स्टार नव्हे तर फाईव्ह स्टार मानांकन मिळवू शकतो. मात्र, त्यासाठी सर्व नगरकरांनी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

अजय चितळे म्हणाले की, शाळांनी परिसर स्वच्छ ठेवावा. शिक्षकांनी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले संपूर्ण योगदान द्यावे.

विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक जमा करावे : महापौर
विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केल्यास त्यांच्यामार्फत पालकांमध्येही जागृती होईल. कचरा घंटागाडीतच टाकला जाणे आवश्यक आहे. कोणीही रस्त्यावर कचरा टाकू नये. जनजागृती झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणार्‍या कचर्‍याचे प्रमाण कमी होईल व पर्यायाने शहर स्वच्छ राहील. तसेच विद्यार्थ्यांनी ‘प्लॅस्टिक मुक्त शहर’ करण्यासाठी त्यांच्या घरातील प्लॅस्टिक गोळा करून मनपास दिल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोबदला दिला जाईल, अशी घोषणाही महापौर वाकळे यांनी यावेळी केली.Post a Comment

Previous Post Next Post