अहमदनगर : बाजारपेठेतील मालमत्तेला महापालिकेने ठोकले टाळे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी महापालिकेने सक्तीची कारवाई सुरू केली आहे. माळीवाडा प्रभाग कार्यालयाने अहमदनगर शहरातील बाजारपेठेत धडक कारवाई करुन मालमत्तेला टाळे ठोकले आहे. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार मनपाने आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी वसुलीचा आढावा घेऊन कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रभाग समिती कार्यालयांना उद्दिष्टही निश्चित करुन दिलेले आहे. त्यानुसार कारवाईला सुरूवात झाली असून, गुरुवारी (दि.5) माळीवाडा प्रभाग कार्यालयाने जुना कापड बाजार परिसरात रुख्मिणीबाई मोहनलाल खंडेलवाल यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यांच्याकडे 1 लाख 92 हजार रुपयांची थकबाकी आहे. कारवाईदरम्यान आणखी दोन थकबाकीदारांनी 4 लाख 55 हजारांची संपूर्ण थकबाकी जमा केल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.
वसुली विभाग प्रमुख जी. एच. झिने, प्रभाग अधिकारी अंबादास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक शाम गोडळकर, लिपिक अंशराम आढाव, श्रीमती साबळे, प्रकाश गांगुल, अजिम शेख, विजय बोधे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. बाजारपेठेत झालेल्या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा करुन कारवाई टाळावी, असे आवाहन उपायुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post