नागरिकत्व दुरूस्ती विधेयक आंदोलन: बंगालमध्ये हिंसाचार


एएमसी मिरर वेब टीम
कोलकाता : नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात ईशान्येकडच्या राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर विरोध प्रदर्शन सुरु आहे. आसाममध्ये परिस्थिती आता हळूहळू नियंत्रणात येत आहे. गुवाहाटी शहरात ब्रॉडबँड सेवा सुरु झाली आहे. मोबाइल इंटरनेट मात्र अजूनही बंदच आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगलाच्या हावडा शहरात कॅब आणि एनआरसी विरोधकांनी डोमजूर सालापजवळ टायर जाळून महामार्ग रोखला. पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स या भागात तैनात करण्यात आले आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरित्व दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर हा हिंसेचा आगडोंब उसळला आहे. गुवाहाटी आणि दिब्रुगडमध्ये काही तासांसाठी संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इथे लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुवाहाटी शहरात सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तर दिब्रुगडमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पोलीस लाऊडस्पीकरवरुन लोकांना संचारबंदी शिथिल केल्याची माहिती देत आहेत. गुवाहाटी शहर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण तिनसुकिया, दिब्रुगड आणि जोरहाट या अप्पर आसामच्या भागामध्ये तणाव असून तिथे हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये आंदोलकांनी शनिवारी सकाळी एका स्टेशनवर तोडफोड केली. शुक्रवारी आंदोलकांनी मुर्शिदाबादमध्येच एका रेल्वे स्टेशनची तोडफोड केली होती. पोलीस स्टेशन आणि रुग्णवाहिकेवरही हल्ला केला होता. काही पोलीसही जखमी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post