खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न


एएमसी मिरर वेब टीम 
जळगाव : पक्षातील नाराज असेलेल्या नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचं दिसत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि संकटमोचक नेते गिरीश महाजन जळगावात पोहचले. बैठकीदरम्यान पक्षांतर्गत वाद झाल्यास ते बाहेर फुटू नयेत, म्हणून बंद दाराआड चर्चा करण्यात आली. परंतु एकनाथ खडसे यांनी बैठक स्थळी हजेरी लावणंच टाळले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांच्या विभागवार बैठका चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होत आहेत. पण खडसे आणि महाजन यांच्या कार्यकर्त्यांमधील कोल्डवॉरमुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बैठका पोलिस संरक्षणात होत आहेत.
माजी मंत्री पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या आरोपाला उत्तर देताना, महाजन यांनी भाजपामधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे खडसे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, खडसे यांनी या बैठकीला येणेच टाळलं.

Post a Comment

Previous Post Next Post