गोपीनाथ मुंडे यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही; खडसेंचा भाजपाला घरचा आहेर


एएमसी मिरर वेब टीम 
बीड : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाला घऱचा आहेर दिला आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज ही वेळ आली नसती. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांमुळेच भाजपाची शेटजी, भटजींचा पक्ष अशी असणारी ओळख बदलून बहुजन समाजाचा पक्ष अशी बनवण्यात यश आल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे गोपीनाथगडावर उपस्थित आहेत.
“शेटजी भटजींचा पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. पण गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षासाठी काम केलं आणि पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बदलण्यात यश आलं. संघर्षाच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्त्व केलं. त्यांचा सहकारी होतो याचा मला अभिमान आहे. पण चांगला कालखंड आला तेव्हा ते निघून गेले,” अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
अडचणीच्या काळात गोपीनाथ मुंडे नेहमी मदत करत असत अशी आठवण यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितली. “माझ्या जीवनात जेव्हा अडचण आली तेव्हा ते पाठीशी उभे राहिले असं सांगताना आज जी परिस्थिती आहे ती गोपीनाथ मुंडे असते तर आली नसती,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
“गोपीनाथ मुंडे यांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही. मर्दासारखे समोरासमोर लढले. कधी विश्वासघात केला नाही,” असं यावेळी एकनाथ खडसे यांनी सांगितलं. “पराभवामागे षडयंत्र असल्याचा स्वानुभव आल्याने पंकजा मुंडे यांनी तसा आरोप केला असावा. पण निवडून येण्याची खात्री असतानाही पक्षाने मला तिकीट दिलं नाही. तर मुलगी इच्छुक नसतानाही ही जागा धोक्यात येऊ शकते सांगूनही मुलीला जबरदस्ती तिकीट देण्यात आलं,” असा खुलासा एकनाथ खडसे यांनी केला.
मुंडेसाहेब आणि आम्ही नेहमी हसत खेळत राजकारण केलं असं सांगताना आजच्या नेतृत्वात खुल्या दिलाने मदत करण्याची भावना राहिलेली नाही, द्वेषाची भावना आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. “एका महिन्यात आम्ही खूप काही पाहिलं. आम्ही ८० तासांचा मुख्यमंत्री पाहिला. भाजपाच्या विरोधी पक्षांचा आज मुख्यमंत्री झाला. काळ किती चमत्कार करतो हे आम्ही एका महिन्यात पाहिलं,” असा टोला यावेळी एकनाथ खडसे यांनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post