विखे पाटलांना पक्षात घेतल्याने आमचे नुकसान झाले : राम शिंदे


एएमसी मिरर वेब टीम 
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनीही त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा झालाच नाही, उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसान झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शनिवारीच एका पत्रकार परिषदेत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही जिल्हा बँकेतील कर्ज वाटपावरुन विखेंना लक्ष्य केले होते.
उत्तर महाराष्ट्रातील 12 जागांवर झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी पराभूत उमेदवारांसोबत आशिष शेलार यांनी बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राम शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली. पराभूत उमेदवारांची पराभवाची कारणे काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी आशिष शेलार यांना नियुक्त केलं आहे. पूर्वी नगर जिल्ह्यात पाच आमदार होते. किंबहूना निवडणुकीच्या आधी मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे पाटील पक्षात आल्याने ती संख्या सातवर गेली होती. या निवडणूकीत या आकड्यात वाढ होणं अपेक्षित होतं. मात्र ती संख्या होती त्या पेक्षा कमी होऊन तीनवर आली आहे. निवडणुकीत विखेंनी सांगितलं होतं की, ही भाजपच्या आमदारांची संख्या 12 करू. मात्र तसं काहीही झालेलं नाही. विखे यांची ताकद नव्हतीच. उलट त्यांची पूर्वापार परंपरा आहे की, ते ज्या पक्षात जातात त्या पक्षात खोड्या करतात. त्या पक्षासाठी हानीकारक वातावरण निर्माण करतात. तेच पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आहे, अशा शब्दात राम शिंदे यांनी विखे पाटलांवर शरसंधान साधले.


Post a Comment

Previous Post Next Post