महाराष्ट्राची वाट लावणारी नव्या सरकारची वाटचाल : मुनगंटीवार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. या महाविकासआघाडी सरकारच्या कामावर माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बोचरी टीका केली आहे.
“नव्या सरकारची वाटचाल ही महाराष्ट्राची वाट लावणारी आहे. महाविकासआघाडी दीर्घकाळ सत्ता चालवण्यासाठी अस्तित्वात आलेली नाही. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येते ते दीर्घकाळ टिकत नाही”, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
“शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाची विचारधारा पूर्ण भिन्न आहे. एका पक्षाला मुख्यमंत्रिपद पाहिजे होते, तर बाकी दोन पक्षांना भाजपला दूर ठेवायचे होते म्हणून यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. जनादेशाच्या बाहेर जाऊन सरकार जन्माला येते ते दीर्घ काळ टिकत नाही. कर्नाटकमध्ये आपण पाहिलेच असेल”, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, सुधीर मनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली. “एकनाथ खडसे हे आमचे नेते आहेत. खडसेंच्या नेतृत्वात मी काम केले आहे. आपल्या आयुष्यातील परिवाराचा वेळ त्यांनी पक्ष वाढीला दिला. त्यांची नाराजी असेल तर ती दूर होईल आणि चांगलं घडेल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ खडसेंना घेण्यास आग्रही आहेत पण ते तिथे जाणार नाहीत”, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post