'हा गांधी, नेहरुंचा नाही तर मोदी आणि शाह यांचा देश आहे'


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : भाजपा आमदाराने हा देश महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु यांचा नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आहे असं वक्तव्य केलं आहे. हरियाणामधील कैथल जिल्ह्यात सुधारित नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपा आमदार लीला राम गुर्जर यांनी हा नवा भारत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आहे असं वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हा नवा भारत महात्मा गांधी, नेहरु आणि मनमोहन सिंग यांचा नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा भारत आहे. तुम्ही बातम्या आणि व्हॉट्सअॅपवरुन लोक येऊन धमकावत असल्याचं ऐकलं असेल. मित्रांनो हा नरेंद्र मोदींचा भारत आहे, आदेश मिळाला तर एका तासांत तोंड बंद केलं जाईल, असं लीला राम गुर्जर यांनी म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. आसाम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचारात जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बोलताना, काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी अफवा पसरवत असून ज्यांना कायद्याबद्दल काही माहिती नाही त्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप केला. खोटी माहिती पसरवली जात आहे. अनेक नेते प्रसारमाध्यमांना मुलाखती देताना राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे (एनआरसी) भारतावर आर्थिक भार पडणार असल्याचं सांगत आहेत. पण मला सांगायचं आहे तुम्ही जी गोष्ट अस्तित्त्वातच नाही त्यात उगाच आपली ऊर्जा वाया का घालवत आहात?, अशी विचारणा यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली.
Post a Comment

Previous Post Next Post