विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना १२ टक्के व्याज द्यावे : खासदार विखे


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : राज्यात अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रति हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत करावी. विम्याची रक्कम विलंबाने देणाऱ्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना १२ टक्के व्याज द्यावे, अशी मागणी करतांनाच अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याच्या धोरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याकडे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नियम १९३ अन्वये कृषी विभागावरील चर्चेत सहभाग घेताना खासदार विखे पाटील यांनी राज्यातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे गांभीर्याने लक्ष वेधले. अवकाळी पावसाने राज्यात ५४ लाख हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी आणि फळबागांचे नुकसान झाले. राज्य सरकारने खरीप व रब्बी पिकांसाठी हेक्टरी ७ हजार रूपये आणि फळबागांसाठी १६ ते १८ हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले असले तरी, यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या तीन पक्षांच्या सरकारने सतेत येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करून, शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली.
पिक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीकडे सभागृहाचे लक्ष वेधताना खासदार विखे म्हणाले की, सरकार ज्या विमा कंपन्याशी करार करते, त्या कंपन्याचा विचार करता भरलेल्या विमा रकमेइतका खर्च कंपन्याच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यासाठी होतो. विमा कंपन्याच्या एजंटची अपुरी संख्या, या समस्येला कारणीभूत ठरत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल, तर विमा कंपन्याच्या एजटांची संख्या वाढवावी लागेल. विम्याची रक्कम देण्यास विलंब करणाऱ्या या कंपन्यांनी १२ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. 
स्व.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली होती. त्याची अंमलजावणी होणे गरजेचे आहे. दुष्काळी भागाकरीता पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरीच्या खोऱ्यात वळविण्याच्या धोरणाची अंमलबजावणी झाल्यास नगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील काही जिल्हे दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल, याकडेही खासदार विखे यांनी सरकारचे लक्ष वेधले.

Post a Comment

Previous Post Next Post