सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसी महाराष्ट्रात लागू होणार नाही : थोरात

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवही लागू करणार नाही, अशी शपथ बाळासाहेब थोरात यांनी राजघाटावर घेतली.

एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा भेदभाव करणारा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही, अशी शपथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी म. गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावर घेतली. नागरिकत्व दुरुस्ती आणि नोंदणीविरोधात काँग्रेसने महात्मा गांधींचे समाधीस्थळ राजघाटवर सोमवारी सत्याग्रह केला, यावेळी ते बोलत होते.

दुपारी तीन ते रात्री आठ असे पाच तास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा तसेच, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल यांच्यासह मध्य प्रदेश आणि राजस्थानचे मुख्यमंत्री कमलनाथ, अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सत्याग्रहात सहभागी झाले होते.

थोरात म्हणाले, महाराष्ट्र कायमच धर्मनिरपेक्ष विचारधारेचं राज्य राहिलं आहे. या राज्यानं स्वतःला कधीही जात आणि धर्माच्या नावावर विभाजित होऊ दिलं नाही. महाराष्ट्र आजही या संविधान बचावाच्या लढाईत न्यायासोबत, सत्यासोबत ठामपणे उभा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या माध्यमातून भारताच्या आत्म्याला ठेस पोहोचणार आहे. सीएए हा कायदा भेदभाव करणारा आहे, त्यामुळे आम्ही भाजपाची ही असंविधानिक वागणूक सहन करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी लागू होणार नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा विकास घडवता आला नाही. रोजगार निर्माण करता आला नाही. त्यामुळे त्यांनी समाजात फूट पाडण्याचे काम हाती घेतले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. देशाची प्रगती खुंटली आहे, हे काम देशाच्या शत्रूंना करता आले नाही पण मोदींनी करून दाखवले. संघाने गेली कित्येक वर्षेसमाजात फूट कशी पाडायची हेच शिकवले. त्याबरहुकूम मोदी कृती करत आहेत. पण या देशाचे संविधान तयार करण्यात विविध धर्मातील व्यक्तींचा समावेश होता. सर्वसमावेशक संविधान कोणालाही पायदळी तुडवू दिले जाणार नाही, अशा शब्दांत यावेळी राहुल गांधींनी सरकारला ठणकावले.

Post a Comment

Previous Post Next Post