हिंसाचार घडवणारे सत्तेत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून या विरोधात होणाऱ्या आंदोलनात हिंसाचार झाला आहे. या घटनांवर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. हिंसाचार घडवणारे सत्तेत आहेत, असा आरोप करत सरकारने वातावरण बिघडवले आहे, असे ते म्हणाले. सरकार रोजगार निर्मितीत अपयशी ठरल्याने ते वातावरण बिघडवत आहेत. सरकारने शांततेत होणारे आंदोलन दडपल्याने हिंसाचार उफाळला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आता जनता रस्त्यांवर उतरली आहे, असेही अखिलेश यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचाराला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे अखिलेश म्हणाले. भाजप जाणूनबुजून द्वेष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या हिंसाचाराचा राजकीय फायदा उचलण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे शांततेत होणारे आंदोलन दडपून सरकार जनतेत भीती पसरवत आहे, असा आरोपही त्यांनी केला. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, जनता लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यांवर उतरल्याचे ते म्हणाले. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक दस्तावेज जनता कोठून आणणार असा सवाल करत अनेक लोकांकडे दस्तावेज नाहीत. त्यांनी काय करायचे असा सवालही त्यांनी केला. सरकारने मुद्दामहून वातावरण बिघडवले आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोणती भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्र्यांची भाषा अशी असते काय, रोजगार आणि मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरल्यानेच सरकार वातावरण बिघडवत आहेत, असे अखिलेश म्हणाले. हिंदुस्थानने आतापर्यंत सर्वांना आश्रय दिला आहे. असे असताना सरकार एनआरसी कसे आणू शकते. आता जगाला आपण कसे तोंड दाखवणार असा सवालही त्यांनी केला.
समाजवादी पक्ष नागरिकता सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात उभी आहे. प्रत्येक स्तरातून याचा निषेध करण्यात येईल. लोकशाहीत विरोध दर्शवणे हा जनतेचा अधिकार आहे. मात्र, विरोध प्रदर्शन करताना हिंसाचार होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने आपण विरोध दर्शवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. भाजप देशभरात द्वेष पसरवत असल्याने समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेत मिसळून सद्भाव आणि बंधूभाव जपण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचनाही त्यांनी केल्या. लोकशाहीच्या मार्गाने समाजवादी पक्ष देशविरोधी कायद्याला विरोध करेल. सरकारने द्वेषभावनेने निर्दोषांना कोणत्याही प्रकरणात अडकवू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


Post a Comment

Previous Post Next Post