'शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणी शिकवू नये'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेनेनं काय भूमिका घ्यावी हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये. शिवसेनेनं आपली सतत आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाबाबत जोवर स्पष्टता येणार नाही, तोवर त्याला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेनेनं लोकसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं याचं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे, असंही ते म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं मतदान करणं ही देशभक्ती आहे आणि त्यांच्या विरोधात मतदान करणं हा देशद्रोह आहे, ही मानसिकता बदलायला हवी. या सर्वांपेक्षा देशात राहणाऱ्या जनतेसमोरचे रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक जे लोकसभेत मांडण्यात आलं त्यावर अद्याप स्पष्टता नाही. भारताच्या शेजारी असलेल्या देशांच्या नेत्यांना एक हादरा देणं आवश्यक होतं. त्या देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अन्यायानंतर त्यांना इशारा देणं आवश्यक होतं. परंतु आता तसं होताना दिसत नाही, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आमच्यासारखे सर्चच पक्ष देशहित डोळ्यासमोर ठेवून काम करतील. या विधेयकाबाबत अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे. राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाण्यापूर्वी त्यामध्ये सुचवलेल्या सुचनांची दखल घेणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तसंच अधिक स्पष्टता येत नाही तोवर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूनं मतदान करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत बहुमतानं मंजुर झालं, यावेळी शिवसेनेनेही याला पाठींबा दिला होता. यावर काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. नागरिकत्व सुधारणा विधेयक देशहिताचं असल्यानं शिवसेनेनं त्याला पाठींबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं.
“राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठींबा दिला आहे,” असंही ते म्हणाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post