कॅबिनेट मंत्री वाढल्याने खातेवाटपाचा घोळ कायम!


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल ३२ दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळात ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असला तरी खातेवाटपाचा घोळ कायम आहे. तीन पक्षांचे ३३ कॅबिनेट दर्जाचे मंत्री करण्यात आल्याने प्रत्येकाला चांगल्या खात्यांची अपेक्षा असून, काँग्रेसने खाते बदलून देण्याचा आग्रह धरल्याने खातेवाटप लांबणीवर टाकावे लागले. दोन दिवसांत खातेवाटप केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
महाविकास आघाडी सरकारचा बहुचर्चित विस्तार पार पडला. विधान भवनाच्या समोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ३६ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विस्तारात राष्ट्रवादीच्या १४, शिवसेना आणि अपक्ष १२ तर काँग्रेसच्या १० जणांचा समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांचा मंत्रिमंडळात झालेला समावेश हाच चर्चेचा विषय ठरला. वरळी मतदारसंघातून निवडून आलेले आदित्य हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून सरकारच्या कामात लक्ष घालत होते. सुरुवातीला काही बैठकांनाही उपस्थित राहिल्याने टीकाही झाली होती. विस्तारात त्यांना थेट कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळाले. अवघ्या सव्वा महिन्यापूर्वी राष्ट्रवादीत बंड करून देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झालेल्या अजितदादांनी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपदाचीच शपथ घेतली. आतापर्यंत अजितदादांनी उपमुख्यमंत्रिपदाची चौथ्यांदा शपथ घेतली. पक्षात बंड करूनही पुन्हा अजितदादांवरच पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली. अर्थात, याबद्दल पक्षात काहीशी नाराजीची भावना आहे. राज्यात कायद्यानुसार  मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांच्या मंत्रिमंडळाची मर्यादा असून, सर्व जागा भरण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांसह ३३ जण कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. राज्यात अलीकडच्या काळात एवढे कॅबिनेट मंत्री करण्यात आले नव्हते. त्यातच तीन पक्षांचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांना महत्त्वाची खाती हवी आहेत. सर्व कॅबिनेट मंत्र्यांचे समाधान होईल एवढय़ा ताकदीची खातीही देणे शक्य होणार नाही. काँग्रेसने कृषी, सहकार किंवा ग्रामविकास या ग्रामीण भागांशी संबंधित खात्यांपैकी एक खाते मिळावे, असा आग्रह धरला आहे. हा तिढा सुटू शकलेला नसल्यानेच खातेवाटप आज करता आले नाही.  विस्तारानंतर लगेचच खातेवाटप केले जाईल, असे आधी जाहीर करण्यात आले होते. पण काँग्रेस व राष्ट्रवादीतील रस्सीखेचीमुळे खातेवाटप लांबणीवर टाकण्यात आले.

मंत्रिमंडळात तूर्त जागा नाही
मुख्यमंत्र्यांसह ४३ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करता येतो. काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा भाजप-शिवसेना युती सरकारने मंत्रिमंडळातील काही जागा रिक्तठेवून इच्छुक आमदारांची उत्कंठा वाढविली होती. ठाकरे सरकारने सर्व ४३ जागा भरल्या आहेत. यामुळेच मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांची नाराजी लगेचच दूर करणे तिन्ही पक्षांना शक्य होणार नाही. विद्यमान काही मंत्र्यांना नारळ दिला जाईल तेव्हाच नव्या चेहऱ्यांना संधी देता येईल.

घराणेशाहीची छाप 
उद्धव ठाकरे सरकारमध्ये घराणेशाहीला बळ मिळाल्याचे दिसते. स्वत: मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यातील प्रभावशाली राजकीय घराण्यांचा वारसा आहे. बाळासाहेब थोरात किंवा जयंत पाटील हे काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घराणेशाहीच्या माध्यमातूनच पुढे आले आहेत. ४३ सदस्यीय ठाकरे मंत्रिमंडळातील १९ मंत्री किंवा राज्यमंत्र्यांची पाश्र्वभूमी ही राजकीय घराण्यांची आहे. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे हे पिता-पुत्र, जयंत पाटील-प्राजक्त तनपुरे हे मामा-भाचे अशा नातलगांच्या जोडय़ा मंत्रिमंडळात आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post